Published on
:
22 Nov 2024, 1:46 pm
Updated on
:
22 Nov 2024, 1:46 pm
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: हिंगोली येथे औद्योगिक वसाहतीमधील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शनिवारी (दि. २३) मतमोजणी होईल. वसमत येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तर कळमनुरी येथे तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघात १४ टेबल लावण्यात आले असून सुमारे १२५ पेक्षा अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांचे मतमोजणीवर लक्ष असणार आहे. हिंगोलीत उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, कळमनुरीत प्रतीक्षा भुते, तर वसमतमध्ये विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात होणार असून पहिल्या टप्प्यात टपाली मतदानाची मोजणी केली जाणार आहे. टपाली मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभेसाठी १० टेबल असून त्यानंतर प्रत्येक विधानसभेसाठी १४ टेबलवर मतदान यंत्रावरील मतमोजणी होणार असून पहिली फेरी पूर्ण होण्यासाठी किमान १० वाजण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतरच्या फेऱ्या अधिक गतीने पूर्ण होतील. टपाली मतमोजणीसाठी सहाय्यक मतमोजणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोणत्या मतदार संघात किती फेऱ्या
दरम्यान, मतमोजणीच्या फेरीनिहाय निकाल जाहीर केला जाणार आहे. वसमत येथे ३२८ मतदान केंद्राच्या २४ फेऱ्या होणार आहेत. कळमनुरीत ३५२ मतदान केंद्राच्या २६ फेऱ्या, तर हिंगोलीत ३४५ मतदान केंद्राच्या २५ होणार आहेत. एकूण ७५ फेऱ्यांमधून मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. वसमत विधानसभा मतदार संघात २ लाख ४० हजार ७३७ मतदान झाले आहे. कळमनुरीत २ लाख ४३ हजार ४९० तर हिंगोली विधानसभा मतदार संघात २ लाख २७ हजार २०२ मतदारांनी मतदान केले आहे.