Published on
:
23 Nov 2024, 2:10 pm
Updated on
:
23 Nov 2024, 2:10 pm
हिंगोली ः विधानसभा निवडणुकीत हिंगोलीतील तीनही जागेवर महायुतीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. एकही जागा राखण्यात महाविकास आघाडीला यश आले नाही. हिंगोली विधानसभा मतदार संघात भाजपचे तान्हाजी मुटकुळे यांनी सलग दुसर्यांदा विजय मिळवत हॅट्रीक साधली तर कळमनुरीत शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांनी तब्बल 30 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय संपादित करीत ठाकरे गटाच्या मनसुब्यावर पाणी फिरविले तर वसमतमध्ये राजू पाटील नवघरे यांनी आपले राजकीय गुरू जयप्रकाश दांडेगावकर यांना चितपट करत आपणच भारी असल्याचे दाखवून दिले.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत हिंगोलीतून भाजपचे तान्हाजी मुटकुळे, कळमनुरीतून शिवसेनेचे संतोष बांगर तर वसमतमधून राष्ट्रवादी काँंग्रेसचे राजू पाटील नवघरे यांनी विजय मिळविला होता. परंतू शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बांगर शिंदे सेनेत तर नवघरे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले. त्यामुळे कळमनुरी व वसमतमधील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मराठा आरक्षण, शेती मालाला मिळत नसलेला दर, पिकविमा यासारख्या मुद्यांवरून मतदारांमध्ये नाराजीचा सूर दिसत होता. ही नाराजी मतदानातून दिसून येईल असे बोलले जात होते. परंतू प्रत्यक्षात मात्र निवडणुकीच्या निकालावरून जरांगे फॅक्टर यासह इतर मुद्दे निष्प्रभ ठरल्याचे दिसून आले. हिंगोलीतून तान्हाजी मुटकुळे यांचा निसटता विजय झाला. तर कळमनुरीतून आमदार संतोष बांगर यांनी मात्र 30 हजारांपेक्षा अधिक मते घेत विक्रमी विजय मिळविला. वसमतमध्येही राजू नवघरे यांनी दांडेगावकर यांचा तब्बल 29 हजार मतांनी पराभव करीत गुरूपेक्षा शिष्य भारी असल्याचे दाखवून दिले. 2019 च्या निवडणुकीचे चित्र 2024 च्या निवडणुकीतही कायम राहिले. महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतदारांनी साथ दिली.
महायुती सरकारने राबविलेल्या लाडकी बहिण योजनेमुळे महिला मतदारांनी महायुतीच्या उमेदवारास भरभरून साथ दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत चाललेल्या जरांगे फॅक्टरच्या भरवशावर राहिलेले महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाले. कळमनुरी व वसमतमध्ये जरांगे फॅक्टरचा प्रभाव जाणवला नाही. कळमनुरीमध्ये ओबीसी मतदारांबरोबरच मराठा समाजानेही महायुतीचे उमेदवार संतोष बांगर यांना साथ दिल्याचे दिसून आले. त्यामुळे आमदार बांगर यांचा विजय सुकर झाला. वसमत विधानसभा मतदार संघात सुरूवातीपासूनच आमदार राजू पाटील नवघरे हे मराठा युवकांमध्ये लोकप्रिय होते. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून मतदार महाविकास आघाडीचे उमेदवार दांडेगावकर यांना साथ देतील असा अंदाज फोल ठरला. मराठा समाजही नवघरेंच्या पाठीशी राहिल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ओबीसी समाजानेही नवघरेंच्या पारड्यात आपली मते टाकल्याने गतवर्षीच्या निवडणुकीपेक्षा अधिक मताने नवघरे विजयी झाले. जनसुराज्य शक्ती पक्षाचे पादेश्वर महाराज यांच्याकडे ओबीसी मतदार जातील या अंदाजावर बसलेल्या दांडेगावकरांना जबर फटका बसला. पादेश्वर महाराज यांनी 35 हजार मते घेतली. परंतू, ओबीसी मतदारांमध्ये मोठे विभाजन टळले. एकीकडे ओबीसी मतदारांनी आ. राजू नवघरेंना दिलेली साथ तर दुसरीकडे कायम जनसंपर्क, लाडकी बहिण योजनेचा महायुतीच्या उमेदवारास फायदा झाला.(Maharashtra assembly poll)
हिंगोली विधानसभेत महायुतीचे उमेदवार मुटकुळे यांच्याविरूद्ध जनमाणसात रोष होता. जरांगे समर्थक म्हणून ओळखल्या जाणार्या डॉ. रमेश शिंदे यांना 20 हजार मते मिळाली. हिंगोलीत काही प्रमाणात जरांगे फॅक्टरचा परिणाम दिसून आला. परंतू ओबीसी व भाजपच्या पारंपारिक मतदारांनी दिलेली साथ आ. मुटकुळेंच्या पथ्यावर पडली. तसेच मोठ्या प्रमाणात झालेले मतविभाजन आमदार मुटकुळेंच्या विजयाचा मार्ग सुकर करून गेला.
जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात परवलीचा ठरलेला सुपडा साफ हा शब्द महाविकास आघाडीसाठी घातक ठरला. तीनपैकी एकही जागा राखण्यात महाविकास आघाडीला यश आले नाही. परिणामी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचाच मतदारांनी सुपडा साफ केल्याचे स्पष्ट झाले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना असलेला फाजील आत्मविश्वास पराभवास कारणीभूत ठरला तर दुसरीकडे महायुतीच्या तीनही उमेदवारांची प्रचार यंत्रणा भेदण्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना शेवटपर्यत यश आले नाही. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातून महाविकास आघाडी बाद झाल्याचे स्पष्ट झाले.