हिंगोलीत शिंदे गट - भाजप कार्यकर्त्यांत राडा:तरुणावर गोळीबार, उपचारासाठी नांदेडला हलवले, निवडणुकीच्या निकालाचे पडसाद
3 hours ago
1
हिंगोली शहरामध्ये निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात राडा झाल्याची घटना घडली असून यामध्ये झालेल्या हाणामारीत चौघे जण जखमी झाले तर गोळीबार झाल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी ता. २३ दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमी तरुणासह चौघांना उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शिंदे सेना व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत माहिती अशी की, हिंगोली, कळमनुरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकी निकालामुळे शहरातीला वातावरण तणाणपूर्ण बनले होते. कळमनुरी विधानसभा मतदार संघातील मतमोजणीच्या पुर्वी काही तरुणांनी कयाधू अमृतधारा महादेव मंदिरात पुजा सुरु केली होती. त्यानंतर दुपारी निकाल जाहिर झाल्यानंतर एका जमावाने बळसोंड भागात जाऊन एका घरावर हल्ला केला. यामध्ये संजय चव्हाण जखमी झाले. या घटनेचे पडसाद शहरात उमटले असून यावेळी दोन गटात राडा झाला. यामध्ये तलवार व कत्तीने हाणामारी झाली. यामध्ये गोळीबार झाल्याने गौरव श्रीराम बांगर गंभीर जखमी झाला. या शिवाय स्वराज बांगर, करण बांगर, विशाल आठवले, लखन चौधरी यांना कत्ती व तलवार लागल्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र गौरव याच्या पोटात गोळी लागल्यामुळे त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. तर इतर चौघांनाही नांदेडला हलविण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे शहारातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून मिरवणुक, रॅली काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या शिवाय एक डीजे देखील पोलिसांनी ताब्यात घेतला असल्याचे सुत्रांनी सांगितले. पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असून शहरातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये - श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधिक्षक, हिंगोली हिंगोली शहरातील नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, सोशल मिडीयावर कोणीही अफवा व चुकीची माहिती पसरवू नये. चुकीची माहिती व अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)