भारतात थंडीचे आगमन झाले असून यंदा डिसेंबरच्या आधीच थंडी जाणवू लागली आहे. थंडीचा जोर हळूहळू वाढत चालला आहे. महाराष्ट्रात थंडीने हळूहळू जोर पकडायला सुरुवात केलीये. थंडीत कोणी विशेष काळजी घ्यावी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कारण हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण जास्त असते. अनेकांना कदाचित ही गोष्ट माहित नसेल. या मोसमात हृदयविकाराच्या झटक्याने जास्त लोकांचा जीव जातो. त्यामुळे थंडीच्या या दिवसाीत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून हृदयविकाराचा धोका टाळता येईल. हे जाणून घेऊयात.
थंडीत हृदयविकाराचा धोका का वाढतो?
थंडीत रक्तवाहिन्या आकसतात. यामुळे रक्तदाब वाढू लागतो आणि त्यामुळे हृदयावर ताण येतो. हिवाळ्यात हवेचे प्रदूषण देखील जास्त असते. यामुळे प्रदूषणाचे कण श्वासाद्वारे आपल्या फुफ्फुसात जातात आणि ते रक्तात जमा होतात. यामुळे मग शिरांमध्ये अडथळे निर्माण होतात. आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
तज्ज्ञ सांगतात की, हिवाळ्यात लोकांची शारीरिक हालचाली कमी असते. तसेच हिवाळ्यात लोकं तळलेले आणि जास्त कॅलरी असलेले अन्न जास्त खातात. सूर्यप्रकाश कमी असल्याने व्हिटॅमिन डीची समस्या देखील उद्भवते. फ्लू सारखे श्वसन संक्रमण हिवाळ्यात वाढते. रक्तवाहिन्यांना यामुळे सूज येऊ शकते. जर थायरॉईड सामान्यपणे कार्य करत नसेल तर हृदयाला कठोर परिश्रम करावे लागतात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो.
हिवाळ्यात कशी घ्याल काळजी?
हिवाळ्यात तुम्ही हृदयाची योग्य काळजी घेतली पाहिजे. जास्त कोलेस्ट्रॉल असलेले बाहेरचे अन्न खाणे टाळले पाहिजे. हृदयाला अनुकूल अशा गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे. फ्लेक्ससीड, लसूण, दालचिनी आणि हळद यांचा जेवणात समावेश करावा. धूम्रपान आणि मद्यपान टाळले पाहिजे. रोज 30 ते 45 मिनिटे व्यायाम करा. रक्तदाब नियंत्रणात राहिली याची काळजी घ्या.