आर्थिक नुकसानीचा राग मनात धरून एका व्यावसायिकाने घराशेजारीच राहत असलेल्या व्यक्तीचा भर दुपारी कुर्हाडीने वार करून खून केला. त्यानंतर रक्ताने माखलेली कुर्हाड हाती घेऊन पिंपरी पोलिस ठाणे गाठत आपण खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पिंपरी कॅम्पातील गेलार्ड चौकात मंगळवारी (दि. 26) रोजी ही घटना घडली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली.
महेश सुंदरदास मोटवाणी (46, रा. गेलार्ड चौक, पिंपरी), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नीने याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. राम गोपीचंद मनवानी (41, रा. गेलार्ड चौक, पिंपरी), असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मनवानी आणि महेश मोटवाणी या दोघांचेही कुटुंब पिंपरी कॅम्पातील गेलार्ड चौकात एकमेकांच्या शेजारी राहतात. राम मनवानी याची अॅल्युमिनियम फॉईलची फॅक्टरी होती. त्या फॅक्टरीमध्ये महेश मोटवाणी हे कामाला होते. महेश यांच्यामुळे फॅक्टरीत आर्थिक नुकसान झाले त्यांच्यामुळेच मी दिवाळखोर झालो, असे राम मनवानी याचे म्हणणे होते. यातून महेश आणि राम या दोघांमध्ये वादाचे प्रकार घडले.
दरम्यान, महेश हे एका ऑनलाइन कंपनीसाठी ‘फूड डिलिव्हरी बॉय’ म्हणून काम करत होते. ते नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास फूड डिलिव्हरीच्या कामासाठी घराबाहेर पडले. त्या वेळी राम मनवानी हा हातात कुर्हाड घेऊन थांबलेला होता. महेश हे घराबाहेर पडताच राम याने त्यांच्यावर कुर्हाडीने वार केले. यात महेश रक्ताच्या थारोळ्यात पडले.
महेश यांच्यावर वार केल्यानंतर राम हा रक्ताने माखलेली कुर्हाड घेऊन पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महेश मोटवाणी यांना काही नागरिकांनी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान महेश यांचा मृत्यू झाला.