अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई; प्रत्येक गुन्ह्याची होणार कसून चौकशीpudhari photo
Published on
:
20 Nov 2024, 10:38 am
Updated on
:
20 Nov 2024, 10:38 am
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांत सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणाऱ्यांची गय केली जाणार नाही, सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेलची पाच पथके स्थापन करण्यात आली असून अफवा पसरविणा-यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे.
जिल्हयात हिंगोलीसह कळमनुरी व वसमत विधानसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हयात सुमारे २००० पेक्षा अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात केले असून या सोबतच राज्य राखीव दलाच्या व सीमा सुरक्षा दलाच्या बार कंपन्यांचे जवान तैनात केले आहे. संवेदनशील भागात स्थानिक पोलिसांसोबतच इतर १८ पथकांच्या माध्यमातून गस्त घातली जात आहे. जिल्हयात सोशल मीडियाच्या माध्यमातून विनाकारण अफवा पसरविल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेलचे पाच पथके कार्यरत ठेवण्यात आली असून पुढील दोन दिवस ही पथके चोवीस तास कार्यरत राहणार आहेत. सोशल मीडियावर चुकीची पोस्ट टाकणे, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणे तसेच अफवा पसरविण्याच्या पोस्ट टाकल्यानंतर तातडीने संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जाणार आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपवरही पोलिसांचे लक्ष असून ग्रुप अॅडमीन यांनी त्यांच्या ग्रुपवर चुकीच्या पोस्ट व्हायरल होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी दिल्या आहेत.
जिल्हधात निवडणुकीच्या अनुषंगाने पडलेल्या गुन्ड्यांचा सखोल तपास केला जाणार असून परिस्थितीजन्य पुरावे तपासले जाणार आहेत. या शिवाय घटनेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुजेट व इतर बाबींची बारकाईने चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हयात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून पाच किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र थांबू नये. मतदारांनीही मतदान केल्यानंतर इतरत्र न थांबता घरी जावे. जिल्हयात कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी केले आहे.