Published on
:
16 Nov 2024, 8:09 am
Updated on
:
16 Nov 2024, 8:09 am
ठाणे : गेल्या पाच वर्षात राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या एका मताच्या जोरावर राजकीय नेत्यांनी संपूर्ण पाच वर्षे राजकीय धुमाकूळ माजवला. आपण नेमकं मत दिलं होतं तरी कुणाला? याचाही उलगडा सध्या मतदारांना होत नाहीये. अशा प्रचंड राजकीय उलथापालथ झालेल्या परिस्थितीत सध्या होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचे चित्र मागील निवडणुकीच्या तुलनेत पूर्णतः बदलेलं दिसून येत आहे. सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणार्या डोंबिवली शहरात देखील अनेक राजकीय घडामोडी गेल्या पाच वर्षात घडून गेल्या आहेत. अशा ढवळून निघालेल्या वातावरणात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत डोंबिवलीकर कोणाच्या बाजूने आपला कौल देतात याबाबत उत्सुकता लागून आहे.
2019 विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मतदान
रवींद्र चव्हाण (भाजपा)- 86 हजार 227 मते
मंदार हळबे (मनसे)- 44
हजार 916 मते
राधाकिा मिलिंद गुप्ते (काँग्रेस)- 6 हजार 613 मते
नोटा - 4 हजार 134
2019 च्या आकडेवारीनुसार डोंबिवली शहर मतदारसंघात 3 लाख 38 हजार 330 मतदार आहेत. ज्यामध्ये 1 लाख 74 हजार 544 पुरुष मतदार आणि 1 लाख 63 हजार 734 महिला मतदार आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या रवींद्र चव्हाण विरोधात मनसेचे मंदार हळबे अशी लढत झाली होती. या निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांना 86 हजार 227 मते मिळाली होती. तर मंदार हळबे यांना 44 हजार 916 मते मिळाली होती. यावेळी मात्र मनसेने येथे आपला उमेदवार दिलेला नाही.
डोंबिवली शहर विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा निवडून आलेले भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण हे महायुतीच्या वतीने चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर चव्हाण यांच्या विरोधात ठाकरे शिवसेना गटाचे तरुण उमेदवार दीपेश पुंडलिक म्हात्रे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. डोंबिवली शहर विधानसभा मतदार संघात दुहेरी लढत असून महायुतीचे रवींद्र चव्हाण विरोधात महाविकास आघाडीचे दीपेश म्हात्रे असा दुरंगी सामना रंगणार आहे.
दीपेश म्हात्रे हे कधी काळी खासदार श्रीकांत शिंदे यांचे खंदे सार्थक म्हणून ओळखले जात. मात्र त्यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदेच्या शिवसेनेची साथ सोडून ठाकरे गटाच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समितीचे माजी सभापती राहिलेल्या दीपेश म्हात्रे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. म्हात्रे तरुणाईत लोकप्रिय असून डोंबिवलीतल्या अठरापगड जाती जमातींचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. तर दुसरीकडे रवींद्र चव्हाण यांनी देखील आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावून आपला प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे एका प्रस्थापित आमदार विरोधात नवख्या उमेदवारात होणारी टफ फाईट डोंबिवलीत चांगलीच चुरशीची होणार अशी चिन्हे दिसून येत आहेत.्र
2008 साली झालेल्या विधानसभा मतदार संघ पुनर्रचनेनंतर डोंबिवली शहर या स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यानंतर 2009 पासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे भाजपचे रवींद्र चव्हाण हे याच मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. चव्हाण यांची महायुती सरकारच्या काळात दोन वेळा मंत्रिमंडळात मंत्री पदावर वर्णी देखील लागली आहे. त्यामुळे या मतदारसंघावर भाजपची पकड मजबूत आहे. यावेळी चौथ्यांदा रवींद्र चव्हाण निवडणूक लढवीत आहेत. चव्हाण यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्याशी होत आहे. दीपेश म्हात्रे यांचा तरुणाईत दांडगा जनसंपर्क आहे. तसेच आगरी कोळी, मुस्लिम, बंजारा व इतर अठरापगड जाती जमातीचे त्यांना समर्थन मिळत आहे. त्यामुळे साहजिकच प्रस्थापित विरुद्ध नवतरुण उमेदवारात होणारी ही निवडणूक डोंबिवलीकरांचे लक्ष वेधून घेत आहे.
डोंबिवलीतल्या मतदारांचा कौल जाणून घेतला असता येथील जनतेत राजकीय रोष दिसून येतो. गटातटात विखुरलेले राजकीय पदाधिकारी जोमात असले तरी सर्वसामान्य जनता मात्र राजकीय क्षेत्रात होत असलेल्या सरमिसळ खिचडीला कंटाळली आहेत असे चित्र येथे दिसून येते. खोटी आश्वासने, विकास कामाच्या नावाखाली होणारा मनमानी कारभार, गोरगरिबांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष अन राजकीय नेत्यांनी स्वार्थासाठी मांडलेला बाजार आदी कारणांमुळे यावेळी सर्वसामान्य मतदारांमध्ये राजकीय नेत्यांबद्दल मोठा रोष दिसून येत आहे. सर्वसामान्य डोंबिवलीकरांमध्ये देखील हा रोष आहेच. त्यामुळे यावेळी सांस्कृतिक नगरीतले सुसंस्कृत मतदार कोणाच्या बाजूने आपला कौल देतात याकडे सार्यांचे लक्ष लागून आहे.
डोंबिवलीत अनेक विकास कामे रखडली आहेत. रस्ते प्रशस्त झाल्याचा दावा करणारे राजकारणी रोज होणार्या जीवघेण्या वाहतूक कोंडीकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याची समस्या कायम आहे. भर पावसाळ्यात देखील तेथे अनेक सोसायट्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. डोंबिवली सारख्या महानगरात आरोग्य सुविधा पुरवणारे एकही सुसज्ज सरकारी दवाखाना येथे नाही. शास्त्री नगर शासकीय हॉस्पिटल आहे, मात्र, तेथे गंभीर आजारपणाच्या रुग्णांवर उपचार करण्याची सोय नाही. गंभीर आजारी रुग्णांना शास्त्रीनगर रुग्णालयातून सरळ कळवा अथवा सायन रुग्णालयात जा असे सांगण्यात येते. त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होतात.डोंबिवली स्थानकावरून प्रवास करणार्या चाकरमानी यांच्या समस्येकडे देखील दुर्लक्ष होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. रिक्षा चालकांची मनमानी, फेरीवाल्यांचा त्रास, गर्दुल्ले, दारुडे यांचा उपद्रव अशा समस्या डोंबिवलीत कायम आहेत. अशा वातावरणात होणार्या या निवडणुकीत डोंबिवलीकर कोणाला मत देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.