Published on
:
28 Nov 2024, 5:47 am
Updated on
:
28 Nov 2024, 5:47 am
नाशिक : वाहन नोंदणी, वाहन चालवण्याचा परवाना, चॉईस क्रमांक आदी प्रादेशिक परिवहन विभागाची कामे सारथी या संकेतस्थळावरून सुरु असतात. मात्र काही दिवसांपासून या संकेतस्थळाचा वेग मंदावल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सारथी संकेतस्थळावर प्रादेशिक परिवहन विभागाशी संबंधित सुमारे ५४ सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या किंवा मोबाइलवरून त्यांची कामे करता येत आहेत. जेणेकरून या विभागातील मानवी हस्तक्षेप कमी करण्यासोबतच पेपरलेस कामकाज करण्यासाठी प्रयत्न होत आहे. मात्र संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची गैरसोय होत आहे. काही क्षणांचे काम तासांवर होत असल्याने नागरिकांकडून नाराजी वर्तवली जात आहे. सर्व्हर डाऊन, संकेतस्थळ बंद होणे किंवा वेग मंदावणे यासारखे अडथळे वारंवार उद्भवत असल्याने नागरिकांना त्यांची कामे करण्यास अडथळे येत आहेत. सारथी संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाल्याने ऑनलाइन अपॉईंटमेंट घेऊन पेठरोड येथील आरटीओ कार्यालयात पोहोचले होते. मात्र संकेतस्थळावरील प्रक्रिया पूर्ण न झाल्याने नागरिकांना कामे पूर्ण न करताच माघारी परतावे लागले. याबाबतची नाराजी अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली असता त्यांनी तांत्रिक बिघाडामूळे गैरसोय झाल्याची माहिती देत त्यांनीही हतबलता व्यक्त केल्याचे बोलले जाते.
गेल्या काही दिवसांपासून संकेतस्थळाचे कामकाज धिम्या गतीने सुरू असून, बुधवारी (दि. २७) देखील त्याचाच प्रत्यय आला. वेबसाइट अपडेशन आणि वेबसाइट मेन्टेनन्सचे काम सुरू असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कामे ऑनलाइन तरिही कार्यालयात खेटा
ऑनलाइन कामे करूनही नागरिकांना कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयातच यावे लागत असल्याने कार्यालयाबाहेरच एजंट लोकांनी वाहनांमध्ये संगणक, प्रिंटर थाटले आहेत. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी, कामे केल्यानंतरही एजंटशिवाय कामे होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे.
अधिक वापराने सर्व्हर डाऊन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेतस्थळावरील सेवांमध्ये वाढ होत आहे. तसेच नागरिकांचा वापरही वाढला आहे. वाहन नोंदणी देखील संकेतस्थळावर होत आहे. चॉइस नंबर व इतर सेवांमुळेही संकेतस्थळावरील नागरिकांचा वावर वाढल्याने ती मंदावत आहे किंवा काही वेळेस बंद पडत असल्याचे सांगितले.