Published on
:
28 Nov 2024, 8:40 am
Updated on
:
28 Nov 2024, 8:40 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : Maharashtra politics | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ नेते अमित शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आणि आमचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल, सरकार बनवताना माझी अडचण नको, असे त्यांना फोन करून सांगितले आहे, असे सांगत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी आपला मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. यानंतर आज शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार नाहीत, असा दावा केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची आज दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांसोबत बैठक होत आहे. दिल्लीत होणार्या बैठकीत महायुतीच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यात येणार आहे. यासोबतच पालकमंत्री, महामंडळे आणि भविष्यात येणार्या विधान परिषद व राज्यसभा निवडणुकांचीही चर्चा होण्याची शक्यता आहे. एक किंवा दोन डिसेंबर रोजी राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी ‘पुढारी’ला सांगितले.