झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. Photo ANI
Published on
:
28 Nov 2024, 10:41 am
Updated on
:
28 Nov 2024, 10:41 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन (Hemant soren) आज (दि.२८) झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. राज्याचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सोरेन यांचा राज्याचा मुख्यमंत्री म्हणून हा चौथा कार्यकाळ असेल. झारखंडच्या इतिहासात चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे ते पहिले राजकीय नेते ठरले आहेत.
शपथविधी सोहळ्यास 'इंडिया' आघाडीतील नेत्यांची उपस्थिती
झारखंडची राजधानी रांचीमधील मारोबाडी मैदानावर शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिबू सोरेन, त्यांची पत्नी रुपी सोरेन, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, काँग्रेस नेते तारिक अन्वर, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन,आप नेते अरविंद केजरीवाल,पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आदी इंडिया आघाडीतील नेते उपस्थित होते.शपथविधी सोहळ्यासाठी रांची शहरात पोस्टर्स लावण्यात आले असून, विशेष सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थाही बदल करण्यात आला होता.
नुकत्याच झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत सोरेन यांच्या नेतृत्त्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चाखालील आघाडीला ८१ पैकी ५६ जागा मिळाल्या. तर भाजप प्रणित 'एनडीए' आघाडीला फक्त २४ जागांवर समाधान मानावे लागले.झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री होणार आहेत. राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले शिबू सोरेन यांचे ते पुत्र आहेत. हेमंत सोरेन यांचा जन्म 10 ऑगस्ट 1975 रोजी शिबू सोरेन आणि रुपी सोरेन यांच्या घरी झाला. हेमंतने 1990 मध्ये पाटणा येथील एमजी हायस्कूलमधून मॅट्रिक पूर्ण केले. १९९४ मध्ये पाटणा हायस्कूलमधून त्यांनी इंटरमिजिएटचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बीआयटी (मेसरा), रांची येथे मेकॅनिकल इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला; परंतु काही कारणांमुळे तो त्याचा अभ्यास पूर्ण करू शकला नाही. शिक्षणानंतर हेमंत यांनी अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये काम केले. हेमंत यांना दोन मुले आहेत. या निवडणुकीत हेमंत यांच्या पत्नी कल्पना यांनीही गांडे विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
पहिल्या निवडणुकीत झाला होता पराभव
हेमंत सोरेन यांना राजकारणाचा वारसा वडील शिबू सोरेन यांच्याकडून लाभला. शिबू सोरेन हे स्वतः झारखंडचे तीन वेळा मुख्यमंत्री होते. याशिवाय हेमंत यांचे मोठे भाऊ दिवंगत दुर्गा सोरेन हे देखील आमदार होते. हेमंतने 2005 मध्ये दुमका येथून स्टीफन मरांडी यांच्या विरोधात पहिली निवडणूक लढवली, ज्यात त्यांचा पराभव झाला. जून 2009 मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले. मात्र, 2009 च्या उत्तरार्धात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते दुमका मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. आमदार निवडून आल्यानंतर हेमंत सोरेन यांनी राज्यसभेचे सदस्यत्व सोडले होते.
Pudhari
भाजपसोबतच्या युतीत उपमुख्यमंत्री, काँग्रेसच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री
अर्जुन मुंडा यांच्या तिसऱ्या कार्यकाळात हेमंत हे सप्टेंबर २०१० ते जानेवारी २०१३ पर्यंत झारखंडचे उपमुख्यमंत्री होते. यानंतर काँग्रेस आणि आरजेडीच्या पाठिंब्याने हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री झाले. जुलै 2013 मध्ये त्यांनी पहिल्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हेमंत यांचा पहिला कार्यकाळ सुमारे 17 महिन्यांचा होता.यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत झामुमोला पराभवाला सामोरे जावे लागले आणि भाजपचा विजय झाला. मात्र, सोरेन बरहैत मतदारसंघातून निवडून आले. रघुबर दास सरकारच्या काळात त्यांनी जानेवारी 2015 ते डिसेंबर 2019 पर्यंत झारखंड विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.
दुसरी टर्म ठरली आव्हानात्मक
२०१९ विधासभा निवणडुकीत सोरेन यांना घवघवीत मिळाले. 29 डिसेंबर 2019 रोजी, हेमंत सोरेन यांनी दुसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र दुसरी टर्म आव्हानांनी भरलेली होती. 2022 मध्ये निवडणूक आयोगाने झारखंडचे तत्कालीन राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे एका याचिकेवर आपले मत पाठवले होते. यामध्ये हेमंत सोरेन यांना स्वतःला खाण लीज देऊन निवडणूक कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल आमदार म्हणून अपात्र ठरवले होते.. 31 जानेवारी 2024 रोजी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जमीन घोटाळा प्रकरणी त्यांना अटक केली होती. अटकेपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, जून २०२४ मध्ये सोरेन यांना जामीन मिळाला. 28 जून रोजी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. चंपाई सोरेन यांनी 3 जुलै 2024 रोजी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. 4 जुलै रोजी हेमंत सोरेन तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री झाले होते.
विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय
नुकत्याच झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीने ८१ सदस्यांच्या विधानसभेत ५६ जागा मिळवल्या आहेत. तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला २४ जागांवर समाधान मानावे लागले. हेमंत सोरेन यांनी बरहैत मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांनी भाजपच्या गमलील हेम्ब्रोम यांचा 39,791 मतांनी पराभव केला. त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनीही गंडेया विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. राज्याच्या 24 वर्षांच्या इतिहासात तीन चेहरे प्रत्येकी तीन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. यामध्ये हेमंत सोरेन यांचे वडील शिबू सोरेन, भाजप नेते अर्जुन मुंडा आणि हेमंत सोरेन यांचा समावेश आहे. झारखंडच्या इतिहासात चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे हेमंत सोरेन हे पहिले राजकीय नेते ठरले आहेत.