शशिकांत पवार
नगर तालुका हा पर्जन्यछायेचा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. लाल कांद्याची काढणी सुरू असून, उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात वातावरणात झालेल्या बदलाने लाल कांद्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. एकरी उत्पादन अर्ध्याने घटल्याचे पहावयास मिळते. लाल कांद्याला बाजारभाव चांगला मिळत असला, तरी उत्पन्नात झालेली घट लक्षणीय आहे.
दुष्काळी पट्ट्यात ज्वारी उत्पादनात अग्रेसर असणार्या नगर तालुक्याची ‘ज्वारीचे आगार’ म्हणून ओळख निर्माण झाली होती. परंतु चालू वर्षी ज्वारीच्या क्षेत्रात अर्ध्यापेक्षा जास्त घट झाली असून, गहू व हरभरा क्षेत्रात वाढ झाली आहे.
रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, मका, गावरान कांदा, लसूण व इतर चारा पिकांची पेरणी करण्यात आली आहे. तालुक्यात सरासरी रब्बी ज्वारीची पेरणी 35 हजार 774 हेक्टर क्षेत्रावर होत असते. परंतु चालू वर्षी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असून, फक्त 14 हजार 806 हेक्टर क्षेत्रावरच ज्वारीची पेरणी झाली आहे. ज्वारीच्या क्षेत्राची जागा गहू, हरभरा या पिकांनी घेतली आहे. त्यामुळे गहू, हरभरा क्षेत्रात वाढ झाल्याचे पहावयास मिळते.
गावरान कांद्याची लागवडही तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असते. परंतु चालू वर्षी तालुक्यातील सर्व भागात मुबलक प्रमाणात पाऊस झाला नसल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावरान कांद्याची लागवड 13 हजार 283 हेक्टर क्षेत्रावर झाली असून, अद्यापही काही भागात लागवड सुरू आहे. गहू, हरभरा, कांदा, लसूण या पिकांना शेवटी पाणीटंचाई जाणवणार असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलाव, बहिरवाडी येथील वाकी तलाव, शेटे वस्ती तलाव, इमामपूर येथील विविध तलाव पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरलेच नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच रब्बी हंगामातील सर्वच पिकांना काही भागांत पाण्याची टंचाई जाणवणार असून, रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन हाती येते की नाही याबाबतही शेतकर्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्यात जानेवारी-फेब्रुवारीत तालुक्यातील विविध भागात पाणीटंचाई जाणवणार असून, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागतील, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसाठी पोषक वातावरण असून, गावरान कांदा व लसूण या पिकांवर अचानक पडलेल्या थंडी व ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला आहे. गावरान कांदा, लसूण या पिकांवर मावा, तुडतुडे, मर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अचानक पडलेल्या थंडीमुळे पिकांची वाढही खुंटल्याचे पहावयास मिळते.
सरासरी पेरणी
तालुक्यात दरवर्षी सरासरी ज्वारीची पेरणी 35 हजार 774 हेक्टर क्षेत्रावर होत असते. परंतु चालू वर्षी फक्त 14 हजार 806 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. गव्हाची सरासरी पेरणी 6 हजार 828 हेक्टरवर, तर हरभर्याची पेरणी 10 हजार 56 हेक्टर क्षेत्रावर होत असते. मका 234 हेक्टर क्षेत्रावर होत असते. ज्वारीच्या क्षेत्रात मोठी घट झाली असून, गहू, हरभरा क्षेत्रात वाढ झाली आहे.
जानेवारीमध्येच पाणीटंचाई जाणवणार!
नगर तालुक्यातील जेऊर पट्टा हा कांदा उत्पादनात अग्रेसर म्हणून राज्यात ओळखला जातो. परंतु जेऊर पट्ट्यातील ससेवाडी, बहिरवाडी, इमामपूर या भागातील बहुतांशी तलाव पूर्ण क्षमतेने भरलेच नव्हते. त्यामुळे जानेवारीमध्येच पाणीटंचाई जाणवणार असल्याने लाल कांद्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.