अर्जुन निकम यांच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात मृतदेहासह ठिय्या मांडला.Pudhari Photo
Published on
:
28 Nov 2024, 1:50 pm
Updated on
:
28 Nov 2024, 1:50 pm
चाकूर, पुढारी वृत्तसेवा: मोहदळ (ता. चाकूर) येथे चाळीस दिवसांपूर्वी दोन गटांत शेती व पूर्व वैमनस्यातून झालेल्या मारहाणीच्या घटनेतील जखमी तरुणाचा उपचारा दरम्यान बुधवारी (दि. २७ ) लातूरच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. यानंतर महिला आरोपीचा जामीन रद्द करून तिला अटक करण्यात यावे, या मागणीसाठी मृत अर्जुन निकम यांच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात आज (दि.२८) मृतदेहासह ठिय्या मांडला. मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील मोहदळ येथे शेतीच्या व पूर्वीच्या वादाच्या कारणावरुन दोन गटांत मारहाण झाली होती. याप्रकरणी परस्पर तक्रारीवरून पोलिसांत गुन्हेही दाखल करण्यात आले होते. यातील पल्लवी अर्जुन निकम यांच्या तक्रारीवरून एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलेसह तिघांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले होते. यातील महिलेला न्यायालयाने जामीन दिला असून एकजण फरार आहे.
या प्रकरणातील जखमी अर्जुन सुर्यकांत निकम (वय ३४) याचा लातूर येथील खासगी रूग्णालयात चाळीस दिवसानंतर बुधवारी (दि. २७) रात्री ९ च्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी गुरूवारी (दि. २८) दुपारी अर्जुन यांचा मृतदेह रुग्ण वाहिकेतून थेट चाकूर पोलीस ठाण्यात आणून ठेवला. व अर्जुनच्या मृत्युस कारणीभूत असलेल्या आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, फरार आरोपीस अटक करावी व महिलेचा जामीन रद्द करून तिला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करीत मृत अर्जुनचे वडील सुर्यकांत निकम यांनी अर्जुनच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भुमिका घेऊन नातेवाईक, ग्रामस्थ यांनी चक्क ठाण्यात साधारणत दोन तास ठिय्या मांडला.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांनी या प्रकरणातील फरार व आरोपी महिलेवर गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण निवळले. पोलीस ठाण्यातच अर्जुनची पत्नी, आई, भाऊ व मुलींनी एकच टाहो फोडला. अर्जुनच्या पार्थिवावर सायंकाळी मोहदळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.