Published on
:
28 Nov 2024, 3:22 pm
Updated on
:
28 Nov 2024, 3:22 pm
अकोला : बाल न्याय अधिनियमाची पूर्तता न करता दत्तक विधान केल्यास तीन वर्षांपर्यंत कैद किंवा एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच कोणत्याही उद्देशाने बालकाची विक्री किंवा खरेदी केल्यास व्यक्तीस पाच वर्षापर्यंत सश्रम कारावास आणि एक लाख रुपयापर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकतो. त्यामुळे इच्छूक पालकांनी कायदेशीर बाबी पूर्ण करूनच दत्तकविधान करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात उत्कर्ष शिशुगृह, मलकापूर ही मान्यताप्राप्त विशेष दत्तक संस्था कार्यरत आहे. तरी दत्तक इच्छूक पालकांनी कायदेशीर दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्याकरीता बालगृहे, विशेषदत्तक संस्था, चाईल्ड लाईन १०९८, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समिती,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. मूल दत्तक घेण्यास इच्छुक पालकांनी cara.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. अकोला जिल्ह्यात सन 2020-21 पासून आजपर्यंत 49 बालकांना कायदेशीररीत्या दत्तक देण्यात आले आहे. त्यात 24 मुले व 25 मुलींचा समावेश आहे.