Mahayuti : महायुतीचं खातेवाटप, कोणाकडे कोणती खाती जावू शकतात?

2 hours ago 2

मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानं गृहखातं पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेचा आहे. मात्र गृहखातं आपल्याकडेच राहावं, यासाठी भाजप आग्रही आहे. जसं गृहखातं एकनाथ शिंदेंना पाहिजे तसंच अर्थखातं अजित पवारांना हवंय. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारमध्ये अजित पवारच अर्थमंत्री होते. अर्थ खातं अजित पवारांना देण्यात भाजपची अडचण नाही. त्यामुळे सध्या रस्सीखेच भाजप आणि शिवसेनेत गृहखात्यावरुनच आहे. महाराष्ट्रात एकूण 43 मंत्री होऊ शकतात. भाजपकडे 132 आमदार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे 57 आमदार आहेत. तर राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडे 23-25 मंत्रिपदं, शिवसेनेला 9-10 आणि राष्ट्रवादीला 8-9 मंत्रिपदं मिळू शकतात.

कोणाकडे कोणती खाती जावू शकतात?

  • भाजपकडे गृह, सामान्य प्रशासन, ऊर्जा, महसूल, सार्वजनिक बांधकाम खातं, गृहनिर्माण, जलसंपदा, कामगार, ओबीसी मंत्रालय, ग्रामविकास, वन खातं, पर्यटन आणि वैद्यकीय शिक्षण सारखी मोठी खाती जावू शकतात.
  • शिंदेंच्या शिवसेनेकडे नगरविकास, उद्योग, शिक्षण, परिवहन खातं, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, पाणी पुरवठा, पशु संवर्धन आणि दुग्धविकास, पणन , आपत्ती व्यवस्थापन, माहिती व जनसंपर्क, माहिती व तंत्रज्ञान ही खाती जावू शकतात.
  • अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार केल्यास, अर्थमंत्री स्वत: अजित पवारच असण्याची दाट शक्यता आहे. त्यासोबतच सहकार खातं, कृषी, अन्न-नागरी पुरवठा, अन्न आणि औषध प्रशासन, मदत-पुनर्वसन, पर्यावरण, युवक कल्याण आणि क्रीडा ,महिला व बाल कल्याण खातं जावू शकते
  • गेल्या अडीच वर्षात फक्त तिन्ही पक्षाचे फक्त तीसच मंत्री होते. विस्तार करु करु म्हणत निवडणुका झाल्या पण विस्तार झाला नाही. आता अडीच वर्षांनी पूर्ण ताकदीचं मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल.

भाजप धक्कातंत्र अवलंबणार?

दरम्यान, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, हे ठरवण्यासाठी दिल्लीतल्या बैठकीसाठी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार राजधानीत दाखल झाले. मात्र त्याआधी शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं चलबिचल निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. केंद्रीय नेतृत्वाकडून आधीच फडणवीसांच्या नावावर मोहर लागल्याची माहिती आहे. बैठकीची फक्त औपचारिकता पूर्ण असताना, शिंदेंसारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री व्हावा ही आपलेपणाची भावना असल्याचं देसाई म्हणाले. तर, राजस्थान मध्य प्रदेश सारखा प्रयोग होणार आहे का? याची माहिती नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत आणि भुवया उंचावल्या आहेत.

एकनाथ शिंदेंनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराला पाठींबा असेल असं म्हणत, मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला. मात्र आरक्षणाचा विषय काढून शंभूराज देसाईंनी मराठा कार्ड पुढं केलं. तर चंद्रकांत पाटलांनी, भाजपनं राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करताना दिलेल्या धक्क्याची आठवण करुन दिली.

मध्य प्रदेश मध्ये शिवराज सिंग चौहानांच्या नेतृत्वात निवडणूक लढल्यानंतर भाजपनं मोहन यादवांसारखा नवा चेहरा निवडला. राजस्थान मध्येही वसुंधरा राजेंच्या नेतृत्वात भाजपनं निवडणूक लढली. पण ऐनवेळी पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मांना मुख्यमंत्री केलं. मात्र महाराष्ट्रात असं काही धक्कातंत्र वापरण्यात येईल, याची शक्यता खूप कमी आहे. 2019 मध्ये फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपनं 105 आमदार निवडून आणले. पण उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्यानं फडणवीसांची संधी हुकली.

अडीच वर्षांआधी शिंदेंच्या बंडानंतरही भाजपनं शिंदेंनाच मुख्यमंत्री केलं आणि पक्षाच्याच आदेशानं फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं. आता पुन्हा फडणवीसांकडे संधी आलीय, आणि महाराष्ट्रातील भाजपच आमदार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही पसंत फडणवीसच आहे. मुख्यमंत्री भाजपचाच असेल हे स्पष्ट आहे आणि त्यातही नाव फडणवीसांचंच आघाडीवर आहे. अर्थात काही तासांच अधिकृत चित्र स्पष्ट होईल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article