Published on
:
28 Nov 2024, 4:45 pm
Updated on
:
28 Nov 2024, 4:45 pm
नवी दिल्ली : राज्यातील आणि देशातील साखर उद्योगाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे षडयंत्र रचले जात आहे, याचा मोठा परिणाम महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यातील साखर उद्योगाला होऊ शकतो, साखर उद्योगाचे मोठे नुकसान होऊ शकते, असा गंभीर आरोप राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केला. पाटील यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रातील एका बातमीचाही संदर्भ दिला. यासंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत, त्यांनी याबाबत योग्य कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मार्च २०२४ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स या प्रसिद्ध वृत्तपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली होती. महाराष्ट्रातील ऊसतोड वाहतूक करणाऱ्या कामगारांवर होणाऱ्या अमानुष प्रकारांबाबत दिशाभूल करणारी ही बातमी होती. ऊसतोड कामगार, मजुरांचे शोषण केले जाते, त्यांना फसवले जाते, त्यांचे अपहरण केले जाते, अशा खोट्या गोष्टी यात लिहिल्या होत्या. याबाबत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघांने तातडीने वस्तुस्थितीनिष्ठ लेखी उत्तर दिले होते.
तसेच महासंघाचे अध्यक्ष पाटील स्वतः आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी अमेरिकेच्या मुंबईस्थित दूतावासात जाऊन याबाबतची माहिती आकडेवारी सादर केली होती. मात्र तरीही तिसऱ्यांदा अशा प्रकारची बातमी आल्याचे असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. न्यूयॉर्क टाइम्स आणि इतर इंग्रजी दैनिकांमधूनही महाराष्ट्रातील साखर उद्योगाबाबत अपप्रचार चालूच ठेवला गेला. या विषयात अधिक खोल गेल्यावर लक्षात आले की, यामागे महाराष्ट्रातून तयार होणाऱ्या साखरेची खरेदी अमेरिकेतील कोकाकोला, पेप्सी अशा बलाढ्य कंपन्यांनी करू नये, जेणेकरून ते महाराष्ट्राचे हक्काचे ग्राहक उत्तरेकडील राज्यांकडे वळवता येण्याची खेळी खेळली जाण्याची दाट शक्यता आहे, असाही संशय त्यांनी व्यक्त केला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलेली बातमी खोटी असून ऊसतोड कामगार, मजूर यांची योग्य व्यवस्था राज्यातील साखर कारखान्यांद्वारे केली जाते. त्यामध्ये त्यांना योग्य निवारा, अन्न, वेळेवर देयके दिली जातात. त्यांच्या स्थलांतरित मुलांना शिक्षण, वैद्यकीय सुविधा आणि मजुरांना आरोग्य विमाही पुरवला जातो. काही प्रकरणांमध्ये साखर कारखानदारांकडून सामूहिक विवाह आयोजित करण्यासारख्या सामाजिक सेवा केले जातात.
असे असतानाही महाराष्ट्र गुजरात, कर्नाटक या राज्यांमधील ऊस उद्योगाविषयी चुकीची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केली जात आहे. या सगळ्यामागे स्थानिक बाजारातील साखर खरेदी केली जाऊ नये असा कट आहे. आपला देश साखर, इथेनॉलमध्ये पुढे चालला आहे, त्यामुळे षडयंत्र रचले जात आहे. अलीकडच्या काळात ऊस उद्योग भरारी घेत असताना ते होऊ नये यासाठी हे मोठे षडयंत्र आहे, यावर भारत सरकारने त्वरित कारवाई करावी, असेही ते म्हणाले.
बीडमधील काही संघटनांकडून चुकीची माहिती
न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीचा संदर्भ देताना पाटील म्हणाले की, बीड जिल्ह्यातील माजलगावमधून काही नोंदणीकृत नसलेल्या संघटनांकडून परदेशात चुकीची माहिती दिली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर काही बातम्या परदेशात येत आहेत. गृह मंत्रालय आणि इतर संस्थांना याची सविस्तर माहिती दिली आहे. केंद्र सरकारने याचा संपूर्ण तपास करावा. कारण या प्रकाराला आळा बसला नाही तर राज्यातील साखर उद्योग अडचणीत येईल असेही पाटील म्हणाले. दरम्यान, केंद्र सरकारने याची चौकशी सुरू केली आहे, कारण ही फक्त साखर उद्योगासाठी नव्हे तर देशासाठी चिंतेची बाब आहे, असेही पाटील म्हणाले.