स्वतः ला वकील म्हणविणाऱ्या एकाने तहसील कार्यालयातील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ घातला.File Photo
Published on
:
28 Nov 2024, 4:55 pm
केज : मला विभागीय आयुक्त थर थर कापतात. तहसीलदार गिड्डे यांना सेवेतून निलंबित करा. तुम्ही निवडणुकीत खूप मोठा घोटाळा केलाय. मी तुम्हाला काम करू देणार नाही. तुम्ही पत्रकारांना तात्काळ बोलवा आणि याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करा. असे जोरजोराने ओरडून, स्वतः ला वकील म्हणविणाऱ्या एकाने तहसील कार्यालयातील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ घातला. तसेच उपजिल्हाधिकारी आणि नायब तहसीलदार यांच्याशी उद्धट वर्तन करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
या बाबतची माहिती अशी की, गुरूवारी (दि.२८) सकाळी ११ च्या सुमारास उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे हे केज येथील तहसील कार्यालयातील त्यांच्या दालनात बसून विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे काम करीत होते. त्यावेळी अचानक शार्दुल देशपांडे नावाचा व्यक्ती आस्थापना विभागात आला. त्याने शुभम राऊत तुमचा कार्यालयाचा दलाल आहे का? तो ओळखपत्र घालत नाही. तुम्ही सर्व ओळखपत्र न घालनारे अधिकारी व कर्मचारी हे दलाल आहेत. असे बोलुन कार्यालयात गोंधळ घातला. तेथे असलेल्या नायब तहसीलदार श्रीमती आशा वाघ या तेथे हजर होत्या.
त्यानंतर त्याने उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, केज नगर पंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी सचिन देशपांडे, महसुलविभागाचे नायब तहसिलदार भंडारे हे विधानसभा सार्वत्रीक निवडणुक २०२४ चे कामकाज करत असलेल्या ठिकाणी त्यांचे ऑफीस कार्यालयामध्ये शार्दुल देशपांडे अचानक घुसला. त्याने काही न विचारता समोर येवुन खुर्चीवर बसला आणि उलटसुलट प्रश्न विचारत गोंधळ घातला.
तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, मंजुशा मिसकर यांना सुध्दा तक्रारी केल्या आहेत. विभागीय आयुक्त गावडे हे सुध्दा ओळखपत्र घालत नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून तो म्हणाला की, ते सुध्दा लोकसेवक आहेत. मालक नाही. असे म्हणुन शार्दुल देशपांडे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या टेबलवर असलेली सरकारी कामकाजाची फाईल उचलली व मोठमोठ्याने आरडा ओरडा सुरु केली. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि शहादेव मेहेत्रे यांनी हजर होवून शार्दुल यास ताब्यात घेतले.