दुरच्या प्रवासासाठी बहुतांश प्रवाशी हे रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. सुरक्षित प्रवास, वेळेत पोहचण्याची हमी आणि परवडणारे दर यामुळे अनेकांची पहिली पसंती ही रेल्वेलाच असते. त्यामुळे रेल्वेने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. आरामदायी प्रवास व्हावा यासाठी अनेक जण काही महिन्यांआधीच तिकीट काढून ठेवतात. मात्र काही वेळा गडबडीत तिकीट बूक करताना प्रवासाची चुकीची तारीख टाकली जाते. त्यामुळे ऐनवेळेस गैरसोय होते. या एका चुकीमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र प्रवासाची तारीख दुरुस्त करता येते. तिकीटावरील प्रवासाची चुकलेली तारीख कशी दुरुस्त करायची? हे आपण जाणून घेऊया.
सर्वसामांन्यांना ऑनलाईन तिकीट कसं मिळवायचं? हे माहित नसतं. अशावेळेस हे सर्वसामन्या प्रवाशी एजंटकडून किंवा तिकीट खिडकीवरुन आरक्षित तिकीट मिळवतात. आरक्षित तिकीटासाठी प्रवाशाला कुठून कुठपर्यंत प्रवास करायचा आहे? प्रवासाची तारीख, वैयक्तिक माहिती आणि इतर माहिती द्यावी लागते. अर्ज भरताना काही वेळेस प्रवासाची चुकीची तारीख टाकली जाते. चुकीची तारीख प्रवासाच्या तारखेच्या 1 दिवसआधीची असेल, तर काही जण त्याच दिवशी प्रवास करतात. मात्र जर प्रवासाच्या तारखेत महिना टाकताना चूक झाली, तर त्याला दुरुस्ती करण्याशिवाय पर्याय नसतो.
भारतीय रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा देते. त्यानुसार रेल्वे प्रवाशांना आरक्षित तिकीटातील प्रवासाची तारीख दुरुस्त करण्याची सुविधा आहे. मात्र ही तारीख बदलण्याची सुविधा फक्त ऑफलाईन काढलेल्या तिकीटांसाठीच असते. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास तुम्ही जर तिकीट खिडकीवरुन तिकीट मिळवलं असेल, तरच तुम्हाला तारीख बदलून मिळेल.
तारीख बदलण्यासाठी काय करावं?
- तुम्हाला तिकीटावरील प्रवासाची तारीख किंवा नाव बदलायचं असेल, तर त्यासाठी असलेल्या वेळेच्या मर्यादेबाबत माहिती असणं गरजेचं आहे.
- तिकीटावरील तारीख आणि नावात बदल करायचा असेल, तर तुम्हाला जवळच्या रेल्वे स्टेशनवर जावं लागेल. तिकीटावरील नाव बदलायचं असेल तर प्रवासाच्या 24 तासांआधी जावं लागेल. तसेच तारखेत बदल करायचा असेल तर 48 तासांआधी स्टेशन गाठावं लागेल.
- तिकीट खिडकीवर तुम्ही काढलेलं ओरिजनल तिकीट आणि तारीख/नाव बदलण्यासाठीचा अर्ज द्यावा लागेल.
- नाव आणि तारीख बदलण्यासाठी नियमांनुसार असलेलं शुल्क द्याव लागू शकतं.