महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. गेल्या चार दिवसांपासून याबाबत सस्पेंस कायम होता. पण अखेर काल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सस्पेंस मोडला आहे. आज दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत महायुतीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. मंत्रिमंडळाची या बैठकीत चर्चा होईल. मुंबईपासून दिल्लीपर्यंत मंत्रीपदासाठी चुरस पाहायला मिळू शकते. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते आता मुख्यमंत्री होणार आहेत. पण राज्यात असे अनेक उपमुख्यमंत्री आहेत जे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोच शकलेले नाहीत.
महाराष्ट्रात गेल्या 46 वर्षात आतापर्यंत 9 नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले आहे. मात्र त्यापैकी एकही जण मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकला नाही. कोण आहेत ते नेते जाणून घेऊयात.
नाशिकराव त्रिपुडे
1978 मध्ये काँग्रेसचे वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात नाशिकराव त्रिपुडे यांना स्थान मिळाले. त्रिपुडे हे त्यावेळी भंडारा विधानसभेचे आमदार होते. पण त्रिपुडे हे केवळ 3 महिने उपमुख्यमंत्रीपदावर राहू शकले.
1978 मध्ये शरद पवार यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्रिपुडे यांना पायउतार व्हावे लागले. यानंतर त्रिपुडे काँग्रेस संघटनेच्या राजकारणात उतरले. पक्षाने त्यांची महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.
त्रिपुडे 1983 मध्ये मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती, पण ते वसंतदादा पाटील यांच्यापेक्षा मागे राहिले. यानंतर त्रिपुडे कधीच मुख्य प्रवाहात राजकारणात येऊ शकले नाहीत.
सुंदरराव सोळंके
शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात सुंदरराव सोळंके यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवले. सोळंके वर्षभराहून अधिक काळ या पदावर राहिले. मात्र पवारांनी पद सोडताच सोळंके देखील बाजूला झाले होते. सोळंकी बीडमधील मोठे नेते होते. 2014 मध्ये त्यांचे निधन झालं.
रामराव आदिक
1983 मध्ये काँग्रेसचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी रामराव आदिक यांना उपमुख्यमंत्री केले. आदिक हे मुंबईतील काँग्रेसचे मोठे नेते होते. आदिक यांना उपमुख्यमंत्री करुन शिवसेनेला बॅकफुटवर पाठवण्याची रणनीती होती. आदिक हे प्रसिद्ध वकील होते. त्यांच्या युक्तिवादासाठी ते प्रसिद्ध होते. 1985 पर्यंत ते उपमुख्यमंत्री पदावर राहिले. ते मुख्यमंत्री होतील अशी चर्चा व्हायची. पण तसं होऊ शकले नाही.
1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपचे युतीचे सरकार स्थापन झाले. तेव्हा शिवसेनेला मुख्यमंत्रीपद तर भाजपला उपमुख्यमंत्रीपद मिळाले होते. भाजपकडून गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. गोपिनाथ मुंडे 5 वर्षे या पदावर राहिले. पण 1999 च्या निवडणुकीत युतीचा पराभव झाला. त्यानंतर मुंडे हे केंद्रीय राजकारणात आले. 2014 मध्ये ते मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री झाले.
छगन भुजबळ
1999 मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद तर राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद मिळाले. तेव्हा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची कमान छगन भुजबळ यांच्याकडे सोपवली. ते ओबीसी समाजातील मोठे नेते आहेत. विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये देखील ते उपमुख्यमंत्री होते. पण ते देखील मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचू शकले नाहीत.
विजयसिंह पाटील
2003 मध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून विजयसिंह पाटील यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले होते. पाटील यांचं त्यावेळी चांगलं वर्चस्व होतं. पाटील 2004 पर्यंत उपमुख्यमंत्रीपदावर राहिले. त्यानंतर त्यांच्याकडून उपमुख्यमंत्री पद काढून घेण्यात आले होते. 2014 मध्ये विजयसिंह पाटील माढा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.
आर आर पाटील
2004 मध्ये शरद पवार यांनी आर.आर पाटील यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली. आर आर पाटील हे सांगली जिल्ह्यातील मोठे नेते होते. शरद पवार यांचे ते विश्वासू मानले जात होते. ते 2008 पर्यंत उपमुख्यमंत्रीपदावर होते. 2008 मुंबई हल्ल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता.
अजित पवार
2010 मध्ये अजित पवार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. अजित पवार यांनी अनेकवेळा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केलीये. मात्र अजून तरी तशी राजकीय समीकरणे जुळू शकलेली नाहीत.