विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करताना शॉक लागल्याने खाली कोसळून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाFile Photo
Published on
:
28 Nov 2024, 4:29 pm
Updated on
:
28 Nov 2024, 4:29 pm
नंदुरबार : शनिमांडळ येथे विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करताना शॉक लागल्याने खाली कोसळून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. मयत कर्मचारी वीजतंत्री नसल्याचे माहित असताना आणि अपघात होऊ शकतो याची जाणीव असताना सुद्धा त्या कर्मचाऱ्यास खांबावर चढायला भाग पाडल्या प्रकरणी तीन जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मयत कर्मचाऱ्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, योगेश प्रकाश सोनवणे (रा. भामरे ता. साक्री जि. धुळे) , गणेश सुर्यवंशी शनिमांडळ आणि वसंत शंभु शिंदे (शनिमांडळ ता.जि. नंदुरबार) या तिघांनी तिलाली तलवाडे ग्रामपंचायतीचे कर्मचारी बापु गोविंद शिंदे (वय ३५ वर्ष रा. शनिमांडळ तिलाली ता.जि. नंदुरबार) हे वायरमन नसतानाही त्यांना इलेक्ट्रीक खांबावर चढवून तारा दुरुस्तीचे काम करण्यास सांगितले. ते काम करण्यासाठी आवश्यक असलेले इलेक्ट्रीक सुरक्षेचे पुर्ण साहित्य नसताना आणि इलेक्ट्रीक काम केल्यास शॉक लागू शकतो यांची कल्पना असतांना सुध्दा बापु शिंदे यांना इलेक्ट्रीक पोलवर दुरुस्त्या करायला भाग पाडले.
परिणामी शॉक लागून बापू शिंदे खांबावरून खाली कोसळले. बापु शिंदे यांना शॉक लागुन ते खांबावरुन पडल्यानंतर आरोपींनी त्यांना उपचारासाठी न नेता घटनास्थळानरून सोडुन पळ काढला. शिंदे यांना उपचारासाठी नेले असते तर त्यांचा जिव वाचला असता याची जाणीव असतांना सुध्दा आरोपी पळुन गेले, याप्रकरणी तिघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक विवेक पाटील अधिक तपास करीत आहेत.