पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरFile Photo
Published on
:
28 Nov 2024, 3:02 pm
Updated on
:
28 Nov 2024, 3:02 pm
नवी दिल्ली : बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत मोदी सरकार अत्यंत चिंतेत आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन तेथील हिंदूंच्या परिस्थितीची माहिती दिली. बांगलादेशातील हिंदूंच्या परिस्थितीबाबत सरकारच्या चिंतेबद्दल संसदेच्या सभागृहाला माहिती देण्याचे निर्देश पंतप्रधानांनी परराष्ट्रमंत्र्यांना दिले आहेत. यासंदर्भात परराष्ट्र मंत्री लवकरच सभागृहात आपले म्हणणे मांडतील. बांगलादेश व्यतिरिक्त परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधानांना जी-७ बैठकीची माहिती दिली. इटलीत झालेल्या बैठकीला उपस्थित राहून जयशंकर परतले आहेत.
संसदेत माहिती दिल्यानंतर या विषयाला सर्व पक्षांचा पाठिंबा मिळेल. यानंतर हा मुद्दा आपल्या देशाकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी संसदेत माहिती दिली की, भारत सरकारने बांगलादेश सरकारला हिंदू, सर्व अल्पसंख्याक आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांचे संरक्षण सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. आज संसदेत तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी केंद्र सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेण्याची मागणी केली. तत्पूर्वी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या मुद्द्यावर केंद्राकडे कारवाईची मागणी करत, हा दुसऱ्या देशाचा विषय असल्याने केंद्र सरकारने कारवाई करावी, असे सांगितले. तृणमूलने या प्रकरणी केंद्र सरकारला प्रत्येक पावलावर पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, २५ नोव्हेंबर रोजी ढाका विमानतळावर चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना अटक केल्यानंतर बांगलादेशात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी चितगाव येथील न्यायालयाबाहेर हजारो लोक जमले असताना सैफुल इस्लाम अलिफ या वकीलाचा मृत्यू झाला. कृष्ण दास प्रभू, ज्यांना नंतर जामीन नाकारण्यात आला आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवण्यात आले.