Published on
:
28 Nov 2024, 3:27 pm
Updated on
:
28 Nov 2024, 3:27 pm
वसमत : शहरातील आसेगाव रस्त्यावरील एका शाळेमध्ये भेटण्यासाठी आलेल्या दिव्यांग सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयाला वसमतच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
वसमत येथील एका शाळेमध्ये वॉचमनचे काम करणाऱ्या काशिनाथ साहेबराव चौरे यास त्याचा सासरा पंडितराव विठ्ठलराव पानधोंडे हा १ फेब्रुवारी २०२४ रोजी भेटण्यासाठी आला होता. यावेळी काशिनाथ यांच्या खोलीमध्ये दोघेही गप्पा मारत बसले होते. यावेळी अचानक दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादातून हाणामारी झाली. यामध्ये काशिनाथ यांनी त्याचा सासरा पंडितराव यांना लाकडी दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत पंडितराव यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणात संबंधित शाळेचे संचालक नामदेव दळवी यांनी वसमत शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून काशिनाथ चौरे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. वसमत पोलिस ठाण्याच्या तत्कालीन महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी पाटील, जमादार केशव गारोळे यांनी आरोपी काशिनाथ साहेबराव चौरे (रा.पुयणी खुर्द) याला अटक केली होती. पोलिसांनी अधिक तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या प्रकरणात दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी काशिनाथ साहेबराव चौरे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी अभियोक्ता म्हणून एन.एच. नायक यांनी काम पाहिले, तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक विनायक केंद्रे, बेटकर, पतंगे यांनी कामकाज केले आहे.