Published on
:
28 Nov 2024, 2:28 pm
Updated on
:
28 Nov 2024, 2:28 pm
गडहिंग्लज : येथील पीओपीचे काम करणार्या ठेकेदाराकडे असलेल्या एका कामगाराने त्यांच्या दुकानालगत असलेल्या एका अल्पवयीन मुलीची दोन दिवसापूर्वी छेड काढली होती. हा प्रकार गुरुवारी गडहिंग्लज शहरातील नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी एकत्र येऊन सदर प्रकाराविरुद्ध संबंधित ठेकेदाराला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्याने हा प्रकार झाल्यानंतर संबंधित कामगाराला मी मारले असून, तो पळून गेल्याचे सांगितल्यावर जमाव संतप्त झाला. संतप्त जमावाने ठेकेदाराच्या दुकानावर हल्ला करुन त्या दुकानाची मोडतोड केली.
दरम्यान, जमाव मोठ्या प्रमाणात संतप्त होऊन पोलिस ठाण्याकडे आला. या ठिकाणी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. कोणत्याही परिस्थितीत गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केल्याशिवाय हलणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे गडहिंग्लज पोलिस ठाण्याच्या आवारात सुमारे तासभर जोरदार दंगा सुरु होता. पोलिस निरीक्षक होडगर यांनी संतप्त जमावासमोर येऊन मुलीच्या नातेवाईकांची फिर्याद घेऊन या प्रकरणी कारवाई करतो, असे सांगितल्यावरही जमाव ऐकण्यास तयार नव्हता.
मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष आप्पा शिवणे यांनी जोवर गुन्हा दाखल करणार नाही, तोवर एकही नागरिक येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली. मनसेचे नागेश चौगुले, संतोष चिकोडे यांनीही या प्रकरणी कारवाई कराच, तोवर जमाव हलणार नाही, असे स्पष्ट केल्याने पोलिसांनीही आम्ही गुन्हा दाखल करुन घेतच आहोत, फक्त मुलीच्या नातेवाईकांनी फिर्याद दिल्याशिवाय पुढील कार्यवाही होणार नसल्याची भूमिका मांडली.
सुमारे तासाभरानंतर मुलीच्या नातेवाईकांना पोलिस निरीक्षकांच्या कक्षात घेऊन या प्रकरणी फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु झाले. एफआयआरची प्रत मिळत नाही, तोवर या ठिकाणाहून हलणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतल्याने पोलिस ठाणे परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिस ठाण्यातील सर्व पोलिसांना ही गर्दी हटविण्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागत होते. मात्र नागरिक हे पुन्हा पुन्हा पोलिस ठाण्यासमोर येऊन गुन्हा दाखल झाला काय, याची विचारणा करीत होते. शेवटी गुन्हा दाखल होईपर्यंत नागरिकांनी तेथेच ठाण मांडले होते. गडहिंग्लजला झालेल्या या प्रकाराने मात्र जोरदार चर्चा सुरु झाली होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांनी पोलिस ठाण्याकडे धाव घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.