चेअरमन जे.जी. सगरे : २८ हजार खातेधारकांना मिळाला दिलासा
लातूर (Saibaba Janata Bank) : १९९७ पासून लातूरकरांच्या सेवेत असलेल्या साईबाबा जनता सहकारी बँकेवर जवळपास अडीच वर्षांपूर्वी अनियमित व्यवहारामुळे रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावले होते. मात्र, जानेवारी २०२४ मध्ये आलेल्या नवीन संचालक मंडळाने रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करून निकषाची पूर्तता केली. २६ नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने निर्बंध हटविले असून २८ हजार ठेवीदारांना दिलासा मिळाला असून बँकेचे सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू झाल्याची माहिती चेअरमन जे.जी.सगरे यांनी दिली.
साईबाबा जनता सहकारी बँकेच्या (Saibaba Janata Bank) लातूर, निलंगा, औसा व चाकूर येथे शाखा आहेत. बँकेचे एकुण २८ हजार खातेधारक आहेत. यातील हजारो खातेदारांच्या दोन वर्षांपासून बँकेकडे जळवास १६ कोटींच्या ठेवी प्रलंबित होत्या. रिझर्व्ह बँकेने निर्बंध हटविल्यामुळे बँकेचे व्यवहार सुरळीत झाले असून २८ नोव्हेंबरपासून ठेवी परत केल्या जात आहेत. गुरूवारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. ज्यांची रक्कम प्रलंबित आहे, अशा खातेदारांना त्यांच्या मागणीनुसार ठेवी परत करण्याच्या निर्णय चेअरमन जे.जी.सगरे, व्हा.चेअरमन सोनू डगवाले, संस्थापक चेअरमन राजेश्वर बुके, संचालक पंडितराव धुमाळ, सुभाषअप्पा मुक्ता, श्रीरंग जटाळ, ओमप्रकाश गलबले, श्रीशैल्य कोरे, विष्णुदास धायगुडे, सत्तारखाँ पठाण, इसरार सगरे, अकबर सगरे, व्ही.एल.कांबळे, तज्ञ संचालक वाय.एस.मशायक यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित…
चेअरमन सगरे म्हणाले, बँकेकडे ज्यांच्या ठेवी आहेत, त्या सुरक्षित आहेत. रिझर्व्ह बँकेने निर्बंध हटविल्यामुळे व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले आहेत. ठेवीदारांनी आपल्या ठेवीची काळजी करू नये. (Saibaba Janata Bank) बँकेकडे निधी उपलब्ध असून ग्राहकांच्या विश्वासास पात्र राहून काम केले जाईल. दरम्यान, गुरूवारी संचालक मंडळाच्या उपस्थितीत काहीजणांना ठेवी परत करण्यात आल्याने ग्राहकांनी आनंद व्यक्त केला.