लातूर (Latur):- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे होणाऱ्या 63 व्या महाराष्ट्र राज्य(Maharashtra state) हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी लातूर येथील केंद्रावर 4 डिसेंबरपासून सुरू होत आहेत. 17 डिसेंबरपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. लातूर येथील स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहात दररोज सायंकाळी 7 वाजता या स्पर्धे अंतर्गत नाटकाचे सादरीकरण होणार आहे. एकूण 13 नाटके या स्पर्धेमध्ये सादर केली जाणार आहेत.
यंदा 13 दिवस रसिक-प्रेक्षकांना मेजवानी
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तांदुळजा येथील युवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे ‘गुलाल’ हे नाटक सादर केले जाणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी (दि.5) लातूर येथील उन्नती फाउंडेशनचे ‘आज महाराष्ट्र दीन आहे…’ हे नाटक सादर होणार आहे. शुक्रवारी लातूरच्या सूर्योदय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे ‘स्मशानयोगी’, शनिवार दि. 7 डिसेंबर रोजी लातूरच्या सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानचे ‘परफेक्ट मिस मॅच’, रविवार दि. 8 डिसेंबर रोजी उदगीरच्या स्पर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे ‘कायनी दोस्त’, सोमवार दि. 9 डिसेंबर रोजी लातूरच्या सम्यक बहुउद्देशीय सेवाभावी ज्ञान प्रसारक मंडळाचे ‘तू यावं’, हे नाटक सादर केले जाणार आहे.
स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहात होणार नाटके
मंगळवार दि. 10 डिसेंबरला लातूरच्या सह्याद्री प्रतिष्ठानचे ‘पुन्हा पुन्हा मोहोंजोदाडो’, बुधवार दि. ११ डिसेंबरला लातूरच्या नाट्य स्पंदन प्रतिष्ठानचे ‘सभ्य गृहस्थ हो..!’, गुरुवार दिनांक 12 डिसेंबरला लातूरच्या कलोपासक मंडळाचे ‘मी कुमार’, 13 डिसेंबरला लातूरच्या कलारंगचे ‘भोवरा’, 14 डिसेंबरला लातूरच्या ग्रामस्वराज संस्थेचे ‘खेळ’, सोमवार दि. 16 डिसेंबर रोजी उदगीरच्या धर्मवीर राजे प्रतिष्ठानचे ‘गावगुंड शेवटी झाला थंड’ आणि मंगळवार दि. 17 डिसेंबर रोजी लातूरच्या अभयरत्न सामाजिक विकास संस्थेचे ‘चाफा सुगंधी’ हे नाटक या स्पर्धे अंतर्गत सादर केले जाणार आहे.
लातूर जिल्ह्यातील 13 संघांनी घेतला सहभाग
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा लातूरच्या स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहात होणार आहे. ही 63 वी स्पर्धा आहे. यावर्षीपासून लातूर हे स्वतंत्र केंद्र झाले आहे. लातूर जिल्ह्यातील 13 संघांनी सहभाग घेतला आहे. यासाठी प्रेक्षकांना तिकीट दर 15/- रुपये व 10/- रुपये असा ठेवण्यात आला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य विभाग अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी दिली. नाट्य रसिकांनी या नाट्य मेजवानीचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन नाट्य स्पर्धेचे समन्वयक ज्येष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण धायगुडे यांनी केले आहे.