राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना खुलं चॅलेंज दिलं आहे. “माझं खुल आव्हान आहे, जितेंद्र आव्हाड यांना माझं खुलं आव्हान आहे. त्यांना जर वाटत असेल ईव्हीएम मशीन हॅक होते. त्यांनी त्यांचा आमदारकीचा राजीनामा द्यावा. आपण बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुंब्रा-कळवा विधानसभेत घेऊया म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल”, असं ओपन चॅलेंज आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलं आहे. आता या चॅलेंजला जितेंद्र आव्हाड काय प्रत्युत्तर देतील? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
“लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रातली जनता महाविकास आघाडीमागे उभी आहे, अशाप्रकारचा टाहो माविआचे सर्वच नेते फोडत आहेत. हे यश महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळालं, अशाप्रकारची यशोगाथा सांगत फिरत होते. या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आलेले यश नाकारण्याचा मविआचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. लोकसभेला यश मिळालं ते महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळालं आणि विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएम हॅक झालं अशाप्रकारे रडीचा डाव सुरू आहे”, अशी टीका आनंद परांजपे यांनी केली.
‘शिवसेनेचा मतदार हा ठाकरेंच्या शिवसेनेपासून दूर होता’
“लोकसभेला ज्यावेळेस यश मिळालं त्यावेळेला महाराष्ट्राची जनता आमच्यामागे आहे. आता विधानसभेला त्याच जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएम हॅक होऊ शकतं, अशा प्रकारची थियरी माविआचे नेते समोर आणत आहेत. लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला कौल मान्य करायचा असतो. महाराष्ट्रााने महायुतीला 230 जागांवर निवडून देत महायुतीवर विश्वास व्यक्त केला. ज्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी युती केली, महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यावेळेलाच शिवसेनेचा मतदार हा ठाकरेंच्या शिवसेना पक्षापासून दूर होत होता. ठाकरेंच्या शिवसेनेला त्याचा अंदाज आला नाही”, असा दावा आनंद परांजपे यांनी केला.
हे सुद्धा वाचा
‘जनेतेने शरद पवार यांना स्पष्ट दाखवून दिलं की…’
“विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत शिवसेना एकत्र होती. त्यावेळेला 56 जागा विधानसभेला निवडून आल्या होत्या. त्यापेक्षा अभूतपूर्व यश शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला यावेळी मिळालं आहे. त्यामुळे शिवसेना उबाठाने आत्मचिंतन करावं. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचे काम महाराष्ट्रामध्ये केलं. त्यांच्या नेतृत्वावर अन्याय करून ज्या वेळेला वेगळी राजकीय भूमिका आमचे नेते अजित पवार यांना घ्यावी लागली त्यावेळी महाराष्ट्राची जनता त्यांच्या निर्णयाच्या बाजूने उभी राहिली आणि शरद पवार यांना स्पष्ट दाखवून दिलं की, तुमच्या विचारांचा खरा वारसदार पक्षाचे नेता हे अजित पवार आहेत”, असं आनंद परांजपे म्हणाले.