अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेला शुक्रवार 29 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं आहे. स्पर्धेत एकूण 15 सामने खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेतील अंतिम सामना हा 8 डिसेंबरला होणार आहे. हे सामने दुबई आणि शारजाह येथे आयोजित करण्यात आले आहेत. स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 2 गटात 4-4 नुसार विभागण्यात आलं आहे.ए ग्रुपमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी आणि शेजारी टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोघांना समावेश आहे. तसेच जपान आणि यजमान यूएई हे 2 संघ आहेत. तर दुसऱ्या बाजूला बी ग्रुपमध्ये नेपाळ,श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा समावेश आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत 3-3 सामने खेळणार आहे. दोन्ही गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीनंतर अंतिम सामना होईल आणि विजेता संघ कोण? हे निश्चित होईल. बांगलादेश गतविजेता संघ आहे.
किती वाजता सुरुवात होणार?
या स्पर्धेतील सर्व 15 सामन्यांना एकाच वेळेस अर्थात सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. हे सामने टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येतील. तसेच लाईव्ह सामने मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येतील.
टीम इंडियाचा पहिला सामना केव्हा?
टीम इंडियाचा पहिला सामना हा 30 नोव्हेंबरला होणार आहे. भारताचा पहिलाच सामना हा हायव्होल्टेज असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ एकमेकांविरूद्धच्या सामन्याने आशिया कप मोहिमेची सुरुवात करणार आहेत.