उद्या दुपारी दोनपर्यंत निकाल हातीPudhari
Published on
:
22 Nov 2024, 11:13 am
Updated on
:
22 Nov 2024, 11:13 am
पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात तर, चिंचवड मतदारसंघासाठी थेरगावातील शंकर गावडे कामगार भवन येथे होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया शनिवारी (दि.23) सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. मतमोजणी पूर्ण होऊन दुपारी दोनपर्यंत निकाल समजेल, असे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी सांगितले.
मतदान बुधवारी (दि.20) झाले. आता निवडणूक विभागाकडून मतमोजणीसाठी मतमोजणी कक्षाची तयारी सुरू झाली आहे. मतमोजणी टेबलांची रचना करण्यात येत आहे. टेबल कर्मचारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलसाठी तीन मोजणी अधिकारी, एक शिपाई असे चारजणांचे एकेक पथक आहे. मोजणी अधिकारी व कर्मचार्यांना पहिले प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पिंपरीसाठी 20 टेबलांवर मतमोजणी होणार असून, त्याच्या 20 फेर्या होणार आहेत. चिंचवडसाठी 24 टेबलांवर मतमोजणी प्रक्रिया होईल. त्यांच्या एकूण 24 फेर्या होणार आहेत. भोसरीच्या मतमोजणीसाठी 22 टेबलांवर 23 फेर्या होतील. टपाली व इलेक्ट्रोल व्होटच्या मोजणीसाठी स्वतंत्र टेबल मांडण्यात येणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र मोजणी पथकेही नेमण्यात आली आहेत.
मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या फेर्यांमध्ये मतदारांचा कल स्पष्ट होईल. त्यामुळे दुपारी बारानंतर निकालाचा कल स्पष्ट होईल. दुपारी दोनपर्यंत संपूर्ण निकाल हाती येऊ शकेल.
चिंचवडचा निकाल दुपारपर्यंत अपेक्षित
चिंचवड मतदारसंघाची मतमोजणी थेरगाव येथील शंकर गावडे कामगार भवन येथे होणार आहे. त्यासाठी 150 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यांना पहिले प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणी सकाळी आठला सुरू होईल. दुपारी दोनपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी सांगितले.