Published on
:
28 Nov 2024, 6:38 am
Updated on
:
28 Nov 2024, 6:38 am
गेल्या 1 ते 14 ऑक्टोबर दरम्यान राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसह अन्य योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिताचा विविध कार्यक्रमाच्या आयोजनात लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद या दोन्ही यंत्रणा व्यस्त होत्या तर 15 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूकीची आचार संहीता लागू झाल्यावर राजकीय पक्ष प्रचारात तर शासकीय यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त होती. आणि नेमक्या या संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांतील 557 गावांतील जनता दूषित पाणी पित होते असे गंभीर वास्तव रायगड जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेच्या पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबतच्या अणूजीव चाचणी अहवालातून समोर आले आहे.
जिल्ह्यातील 52 प्राथमिक आरोग्य केेंद्रांच्या माध्यमातून दरमहिन्याला पाणी नमुने संकलीत करुन जिल्हा प्रयोगशाळेत अणू चाचणी करिता पाठविण्यात येतात. ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील 52 पैकी 23 आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील पाणी नमुने 100 टक्के दुषित असल्याचे स्पष्ट झाले असून त्यात 557 गावांचा समावेश आहे.
ऑक्टोबर महिन्यात रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांतील एकूण 1 हजार 380 पिण्याच्या पाण्याचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत अणुजीव चाचणीकरिता पाठविण्यात आले होते. त्यातील 46.6 टक्के म्हणजे 643 पाणी नमुने दुषित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेच्या मुख्य अणुजीव शास्त्रज्ञांनी दिला आहे. या अहवालानुसार रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यांतील 20 पैकी 20 म्हणजे 100 टक्के पाणी नमुने दुषित निष्पन्न झाले आहेत. तर माणगांव तालुक्यांतील 84 पैकी 78 म्हणजे 92.9 टक्के आणि म्हसळा तालुक्यांतील 61 पैकी 56 म्हणजे 91.8 टक्के पाणी नमुने दुषित निष्पन्न झाले आहेत. सुधागड तालुक्यांतील 39 पैकी 33 म्हणजे 84.6 टक्के पाणी नमुने दुषित निष्पन्न झाले आहेत.
मुरुड तालुका वगळता रायगड जिल्ह्याच्या उवर्र्रित तालुक्यांत अलिबागमध्ये 256 पैकी 106 म्हणजे 41.4 टक्के नमुने दुषित, कर्जतमध्ये 159 पैकी 67 म्हणजे 42.1 टक्क्के दुषित, खालापूर तालुक्यांत 121 पैकी 52 म्हणजे 43 टक्के दुषित, महाड तालुक्यांत 79 पैकी 36 नमुने म्हणजे 45.6 टक्के दुषित, मुरुड तालुक्यांत 52 पैकी 4 म्हणजे 7.4 टक्के दुषीत, पनवेल तालुक्यांत 187 पैकी 47 म्हणजे 25.1 टक्के दुषीत, पेण तालुक्यांत 115 पैकी 40 म्हणजे 34.8 टक्के दुषीत, पोलादपूर तालुक्यांत 15 पैकी 7 म्हणजे 46.7 टक्के दुषीत, रोहा तालुक्यांत 114 पैकी 57 म्हणजे 50 टक्के दुषीत, श्रीवर्धन तालुक्यांत 51 पैकी 30 म्हणजे 58.8टक्के दुषीत, तर उरण तालुक्यांत 26 पैकी 10 म्हणजे 38.5 टक्के पाणी नमुने दुषीत निष्पन्न झाले आहेत.
सर्व प्राथमिक आरोग्य केेंद्रांना जिल्हा आरोग्य अधिकार्यांचे कार्यवाहीचे आदेश
राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग ग्रामविकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या आंतरविभागीय समन्वयाने जलजन्य आजारांचे प्रभावी नियंत्रण करण्यात येते. त्यासाठी दरमहा गावपातळीवरुन प्रत्येक पाणी स्त्रोताची तपासणी केली जाते. त्याचा अहवाल जिल्हा प्रयोगशाळा रायगड अलिबाग येथुन प्राप्त झाला आहे. त्यात दुषित पाणी नमुने आढळुन आले आहेत. दुषित स्त्रोतांचे शुध्दीकरण करुन दुषित आलेले पाणी नमुने पुर्नतपासणीसाठी तत्काळ पाठविणेत यावेत व जनतेस पिण्यायोग्य पाणी पुरवठा होईल, याची दक्षता घेवुन त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केेंद्राच्या वैद्यकीय अधिकार्यांना दिले आहे.
असलेली प्राथमिक आरोग्य केंद्रे
तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र
अलिबाग चिखली
कर्जत आंबिवली, कळंब, खांडस
खालापूर वावोशी
महाड पाचाड
माणगांव इंदापूर, गोरेगांव,
नांदवी, निजामपूर, शिरवली
म्हसळा खामगांव, मेंदडी, म्हसळा
मुरुड आगरदांडा
पनवेल आपटा,वावंजे
पोलादपूर पितळवाडी
रोहा नागोठणे
श्रीवर्धन वाळवटी
सुधागड जाभूळपाडा, पाली-सुधागड
तळा तळा