राज्यात विधानसभा निवडणुकीत उद्या प्रचाराच्या तोफा थंडावतील. प्रचाराचा धुराळा खाली बसेल. यावेळी उमेदवारांची निवड आणि बंडखोरांचं, अपक्षांचं आव्हान यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रचारात फार काही उत्साह दिसला नाही. आता मोठ्या चर्चा घडल्या नाहीत. प्रचाराला धार दिसली नाही. पण काही उमेदवारांनी या निवडणुकीत स्वत:ची प्रचाराची हटके स्टाईल दाखवली. त्यात अमरावती मतदारसंघातील या उमेदवाराची विशेष चर्चा आहे.
रोड रोलरची जोरदार चर्चा
इंडियन यूनियन मुस्लिम लीगचे उमेदवार इरफान खान हे अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आखाड्यात शड्डू ठोकून आहेत. त्यांनी हटके प्रचारावर भर दिला आहे. त्यांना आयोगाने रोड रोलर हे चिन्ह दिलं आहे. त्यांनी चिन्ह मिळताच नवाकोरा रोड रोलरच खरेदी केला आणि त्यांच्या प्रचार कार्यालयासमोर उभा केला. इतकेच नाही तर त्यांनी या रोड रोलरला विद्युत रोषणाई केली. लाईटिंगच्या झगमगाटीत हा रोलर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
हे सुद्धा वाचा
जमील कॉलनीत त्यांचे प्रचार कार्यालय आहे. संध्याकाळी हा नवाकोरा रोड रोलर विद्युत रोषणाईने न्हाऊन निघतो. येणारे जाणाऱ्या नागरिकांमध्ये त्याची चर्चा आहे. तर सोशल मीडियावर सुद्धा त्यांच्या या हटके प्रचाराची चर्चा रंगली आहे. कुणाचं पारडं जडं, कुणाचं खाली, या चर्चेशी इरफान खान यांना काही देणं घेणं नाही. आपली निशाणी रोड रोलर असली तरी या निवडणुकीत तो वेग घेईल आणि आपला विजय होईल, असा विश्वास इरफान खान यांनी व्यक्त केला आहे.
रोड रोलरची मजबूत साथ
इरफान खान यांच्याकडे अगोदरच एक रोड रोलर होता. अमरातवतीत आपण तीन एकर जमिनीवर हॉकीचं अत्याधुनिक मैदान तयार केल्याचे ते अभिमानाने सांगतात. एक रोलर असतानाच आयोगाने त्यांना रोलर हेच निवडणूक चिन्ह दिल्याने नवीन रोड रोलर खरेदी केला. हॉकीचं मैदान रोलरनेच तयार केले. आता लोकशाहीतील मैदान आपणच मारणार असल्याचा विश्वास त्यांना वाटत आहे.