कल्याण विभागातील शिवसेना ठाकरे गटाच्या 4 उमेदवारांसाठी उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली. या बैठकीत अजित पवार म्हणजे कोणतेही सरकार आले तरी मी उपमुख्यमंत्री आहेच. असा उपमुख्यमंत्री भव:चा आशीर्वाद घेऊन आले आहेत. परंतु आता जनता त्यांनाही सोडणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रद्रोही महायुतीला आता महाराष्ट्र हद्दपार करेल आणि महाविकास आघाडी सत्तारूढ होईल, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मिंधे आता कुठेच सत्तेवर येणार नाहीत. ज्यांनी महाराष्ट्राशी द्रोह केला, त्यांना जनता माफ करणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, आमचा लढा हा महाराष्ट्र हिताचा लढा आहे. मोदी शहांनी महाराष्ट्राला कंगाल करण्याचे ठरवले आहे. म्हणून इथले उद्योग ते गुजरातला नेत आहेत. मुंबईची आर्थिक राजधानी त्यांना अहमदाबादला न्यायची आहे. हे सर्व तुम्ही होऊ देणार आहात का, असा सवाल करत ठाकरे यांनी कुठल्याही विकाऊ आमदाराला यापुढे जनता थारा देणार नाही, असा आमचा विश्वास असल्याचे सांगितले. आमची विकासाची पंचसुत्री सत्ता येताच लागू करणार, जुनी पेन्शन योजना आम्ही देणार, असेही ठाकरे म्हणाले. आज शेतीला हमीभाव नाही. गरीब शेतकर्यावर आसूढ ओढला जातो. महागाई प्रचंड वाढलेली आहे. त्याला न्याय देण्याऐवजी महाराष्ट्र अदानीच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे. ही कृत्ये आम्ही होऊ देणार नाही. महाराष्ट्राशी ज्यांनी द्रोह केला त्यांच्याशी कदापि युती करणार नाही, असेही ठाकरे यांनी जाहीर केले.