Published on
:
16 Nov 2024, 8:17 am
Updated on
:
16 Nov 2024, 8:17 am
मनमाड : आमचे सरकार सत्तेवर येणार असून, गद्दारांना धडा शिकविणार आहे. कांदा, सोयाबीन याला हमीभाव देऊ, मुलींप्रमाणे मुलांनादेखील मोफत शिक्षण देण्यासोबत शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात येईल, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.
ठाकरे यांचे हेलिकॉप्टरने शहरात आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्व प्रथम शहरातील गुरुद्वाराला भेट देऊन आशीर्वाद घेतले. गुरुद्वारात शीख धर्माचे धर्मगुरू गुरू नानकदेवजी यांच्या 555 व्या प्रकाशपर्वानिमित्त शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या. गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजितसिंग यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत करून सत्कार केला. त्यानंतर जाहीर सभेत त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली. महागाईने सर्वसामान्य माणूस होरपळला असून, विकासाच्या खोट्या गप्पा केल्या जात आहेत. मोदींकडून देशाची दिशाभूल केली जात आहे. अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकरी कोलमडला असताना ते शासकीय मदतीपासून वंचित आहेत. आपले सरकार सत्तेवर येताच शेतकर्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. आम्ही हमी देणारे असून, शब्द पाळणारे बाळासाहेबांचे सच्चे कार्यकर्ते असल्याचे सांगत त्यांनी शिंदेंवर जोरदार टीका केली.