Published on
:
16 Nov 2024, 10:05 am
Updated on
:
16 Nov 2024, 10:05 am
हिंगोली : पुढारी वृतसेवा : महाविकास आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब असून, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे सरकार आणावयाचे की औरंगजेबचे, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंगोली येथील जाहीर सभेत शुक्रवारी (दि.१५) विचारला. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाला पाखंड म्हणणाऱ्यांना साथ देत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
अमित शहा यांची शुक्रवारी हिंगोली येथील रामलीला मैदानावर महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी शहा म्हणाले की, महाराष्ट्रात औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव, अहमदनगरचे अहिल्यानगर, वर्सोवा वरळी सी लिंकचे स्वातंत्र्यवीर सावरकर, असे नामकरण करण्यात आले. मात्र काँग्रेसने नवीन उपक्रमांना पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याशिवाय कोणाचेही नाव दिले नाही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याचे काम काँग्रेसने केल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेस सरकार पायउतार झाल्यानंतरच बाबासाहेबांना भारतरत्न मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांना लॉन्च करण्याचे यापूर्वी वीस वेळा प्रयत्न केले. आता २१ वा प्रयत्नही फोल ठरणार असल्याची टीका त्यांनी केली.
काश्मीरमधील ३७० कलम पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव काँग्रेस पक्षाने आणला आहे. मात्र गांधी घराण्याची चौथी पिढीही हे कलम पुन्हा लागू करू शकणार नाही. काँग्रेसने ७० वर्षे राम मंदिर अडवून ठेवले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांतच केसही जिंकली, भूमिपूजन केले. मंदिर उभारून प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाही केली. यावर्षी प्रथमच प्रभू श्रीरामाची दिवाळी भव्य राम मंदिरात झाल्याचे त्यांनी सांगितले. देशात सर्वत्र बॉम्बस्फोट होत असताना सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांचे काँग्रेसचे सरकार शांत बसले होते, पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करून अतिरेक्यांचा खात्मा केला. मोदी यांनी देशाला सुरक्षित व समृद्ध बनवण्याचे काम केले, असा दावा शहा यांनी केला.
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस सरकार गरजू जनतेला समर्पित असून जनतेला घरे, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, धान्य, मोफत गॅस सिलिंडर व आता पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत औषधोपचाराची व्यवस्था केल्याचेही शहा यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते, हिंगोलीचे उमेदवार तान्हाजी मुटकुळे, कळमनुरीचे शिंदे सेनेचे उमेदवार संतोष बांगर, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, कैलास काबरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र
अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. अफजलखान, औरंगजेबाची कबर सुशोभित करणाऱ्यांना ठाकरे कशी काय साथ देतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपले संपूर्ण जीवन हिंदुत्वासाठी खर्ची केले. त्यांच्याबद्दल तरी चार चांगले शब्द उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याकडून वदवून घ्यावेत, असे आव्हान त्यांनी केले. मविआचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत, असे ते म्हणाले.