Published on
:
16 Nov 2024, 12:30 pm
Updated on
:
16 Nov 2024, 12:30 pm
आजच्या अनेक अर्थानी जवळ आलेल्या जगात संपर्क, संवाद आणि भाषिक व्यवहाराची गरज कधी नव्हे इतकी वाढली आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर मुळातच भाषेची जाण असणाऱ्या व्यक्तीने परकीय भाषा शिकली तर भाषाप्रेमाचं रूपांतर करिअरच्या संधी मिळवण्यामध्ये होऊ शकतं, हे सहजच लक्षात येईल. परदेशी भाषा येण्याचा फायदा अनेक प्रकारे करून घेता येऊ शकतो. भाषांतर करण्याच्या साहित्यातील अवघडपणा, किचकटपणा, कामाची निकड आणि कामाचं वैशिष्ट्य यावर आर्थिक मोबदला अवलंबून असतो.
तरीही आव्हानात्मक, सन्माननीय आणि भरपूर उत्पन्न मिळवून देणारी नोकरी किंवा व्यवसाय यातून उपलब्ध होण्याची शक्यता आजघडीला मोठी असल्याचं सांगितलं जातं. परक्या भाषांवर प्रभुत्व मिळवल्यावर दुभाषा म्हणून काम करता येतं. अर्थात, त्या दृष्टीने संभाषण, चर्चा यांचं भाषांतर न बिचकता, तत्काळ करण्याचं कसब अवगत करावं लागतं. दुभाषाला भाषांतर करताना शब्दाचे अर्थ आणि संदर्भ बदलणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागते.
सर्व तन्हेच्या वाक्प्रचारांची, म्हणींची चांगली माहिती असावी लागते. त्यातून मूळ संभाषण किंवा चर्चा अधिक वाचनीय किंवा श्रवणीय होण्याची शक्यता वाढते. संवादाचं, चर्चेचं भाषांतर एकाच वेळी, मुद्देसूद आणि अनुक्रमाने करणं हे दुभाषाचं मूलभूत कसब मानलं जातं. ते तत्काळ केलेलं असलं तरी तितक्याच सहजतेने आणि बिनचूक करावं लागतं. दुभाषाला करायचं काम हे तांत्रिक, सांस्कृतिक, सामाजिक अशा दोन्ही प्रकारचं असू शकतं. बहुतेक आंतरराष्ट्रीय संस्था, संघटना दुभाषा नेमतात. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रात परदेशी पाहुणे, व्यापारी मंडळं यांच्याबरोबरच्या सभांसाठी, चर्चासाठी दुभाषा नेमले जातात. काही संस्था दुभाषा पुरवण्याचंही काम करतात.
अर्थात, स्वतंत्रपणे दुभाषाचं काम करण्यालाही वाव आहे. देशादेशांमधला व्यापार आणि त्यामुळे व्यवहार आणि संपर्क या सगळ्याच गोष्टी अलीकडच्या काळात विस्तारत आहेत. म्हणूनच विविध भाषांमधल्या संवादाची गरज लक्षात घेतली, तर दुभाषा म्हणून काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींची मागणी, त्यांना मिळणारा मान आणि धन वाढणार, असं म्हणण्यास वाव आहे.