मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात सहा जणांच्या हत्येनंतर राज्याची राजधानी इंफाळमध्ये तणाव वाढला आहे.
Published on
:
16 Nov 2024, 1:53 pm
Updated on
:
16 Nov 2024, 1:53 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात सहा जणांच्या हत्येनंतर राज्याची राजधानी इंफाळमध्ये तणाव वाढला आहे. वाढत्या तणावादरम्यान हिंसक निदर्शने सुरू झाली आहेत. आंदोलकांनी इम्फाळमधील दोन मंत्री आणि तीन आमदारांच्या घरात घुसून त्यांच्याविरोधात न्यायाची मागणी केली. ही तणावाची परिस्थिती पाहता इंफाळमध्ये शनिवारी संचारबंदी जाहीर करण्यात आली. तसेच राज्यातील सहा जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
जिरीबाम येथून सोमवारी बेपत्ता झालेल्या सहा जणांचे मृतदेह जिरी नदीत तरंगताना आढळून आले. या घटनेनंतर मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये तिव्र निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांना हिंसक वळण लागले. यात इंफाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, बिष्णुपूर, थौबल, काकचिंग, कांगपोकपी आणि चुराचंदपूर जिल्ह्यात दोन दिवस इंटरनेट बंद करण्यात आले. इम्फाळ खोऱ्यातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराची नोंद झाली आहे. हिंसक जमावाने अनेक आमदारांच्या घरांवर हल्ला केला असून मालमत्तेची नासधूस केल्याचे समोर आले आहे.
इम्फाळ पश्चिम जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी किरणकुमार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, शनिवारी दुपारी साडेचार वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली. गृह मंत्रालयाने सुरक्षा दलांना शांतता राखण्याचे निर्देश दिले असून लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून इम्फाळ खोऱ्यातील डोंगराळ भागातील मेईतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचारात 200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर हजारो लोक बेघर झाले आहेत.