Published on
:
16 Nov 2024, 3:52 pm
अमरावती : मुंबईतील धारावी येथील जमीन अदानी यांच्या घशात टाकण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले, राज्यातील सध्याचे सरकार हे संविधानविरोधी आहे. असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमरावतीत धामणगाव रेल्वे येथे शनिवारी (दि.16) महाविकास आघाडीच्या प्रचार सभेदरम्यान भाजप व महायुती सरकार वर बोलताना केला.
आमदारांना फोडून त्यांना विकत घेऊन सरकार पाडा असे संविधानात कुठेही लिहिले नाही.आमदारांची खरेदी विक्री कोट्यावधी रुपयांमध्ये झाली. हे पैसे कुठून आले असा सवाल विचारात त्यांनी धारावीच्या जमिनीचा व्यवहार त्या बदल्यात अदानींसोबत झाल्याचा आरोप केला.
या सभेदरम्यान छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेस संघटन प्रमुख के सी वेणूगोपाल, खासदार बळवंत वानखडे,धामणगाव रेल्वे मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वीरेंद्र जगताप,तिवसा मतदार संघाच्या उमेदवार यशोमती ठाकूर, अचलपूर विधानसभेचे उमेदवार बबलू देशमुख यांच्यासह काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींना विसरण्याचा आजार
राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की मी जे काही बोलतो तेच नरेंद्र मोदी बोलत आहेत. त्यांना विसरण्याचा आजार झाला आहे. आम्ही उपस्थित केलेले मुद्दे ते आपल्या भाषणात मांडतात. मी संविधानाच्या बाबतीत बोललो तर मलाच संविधान विरोधी असल्याचे ते आपल्या भाषणात सांगतात. आम्ही जात निहाय जनगणनेची मागणी केली तर उद्या चालून नरेंद्र मोदी मला जातनिहाय जनगणनेच्या विरोधात राहुल गांधी आहे असे देखील म्हणू शकतात,असेही ते म्हणाले.
मोदींचे सरकारमध्ये सर्वसामान्यांना स्थान नाही
मोदींचे सरकारमध्ये सर्वसामान्यांना स्थान नाही. देशातील छोटे व्यवसाय आणि उद्योग संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. जीएसटी आणि नोटबंदीतून ते साध्य करण्याचा प्रयत्न झाला. देशातील उद्योगपतींचे कोट्यावधींचे कर्ज सरकार माफ करते मात्र शेतकऱ्यांचे कर्ज का माफ करत नाही असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला. राज्यातील आणि विदर्भातील शेतकरी सोयाबीन उत्पादक यांची स्थिती अतिशय वाईट आहे. शेतमालाला भाव नाही. शेतकरी कर्जबाजारी होत असताना उद्योजकांचे कोट्यावधींचे कर्ज माफ केलं जातं हे दुर्दैव आहे.