नागपुर येथे पोहे तयार करताना राहुल गांधी.Pudhari Photo
Published on
:
16 Nov 2024, 5:44 pm
Updated on
:
16 Nov 2024, 5:44 pm
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी विदर्भात चिमूरच्या सभेनंतर परत जाताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी थेट नागपुरातील रामजी श्यामजी पोहेवाले यांच्या दुकानात पोहचले. त्यांनी तरुणांशी बेरोजगारी, संविधान रक्षण आणि इतरही काही मुद्द्यांवर चर्चा केली. विशेष म्हणजे या ठिकाणी त्यांना गरमागरम रस्सा पोहे खाण्याचा मोह अनावर झाला आणि त्यांनी स्वतः देखील पोहे तयार केले.
यावेळी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेंनीथला, दक्षिण पश्चिम नागपूरचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे प्रामुख्याने उपस्थित होते. विमानतळावर जाण्यापूर्वी कडक सुरक्षा व्यवस्थेत राहुल गांधी अचानक वर्धा रोडवरील या हॉटेलमध्ये आल्याने उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील सभा करून राहुल गांधी हेलिकॉप्टरने नागपूरला पोहचले. नागपूर विमानतळावरून थेट इकडे येत त्यांनी हॉटेल मालकांसह तिथे उपस्थित तरुणांशी काही वेळ गप्पा मारल्या आणि राहुल गांधी विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दक्षिण पश्चिम मतदार संघ आहे हे विशेष.