Published on
:
16 Nov 2024, 6:01 pm
Updated on
:
16 Nov 2024, 6:01 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनच्या पूर्वेकडील यिक्सिंग शहरात शनिवारी एका 21 वर्षीय विद्यार्थ्याने कॉलेज कॅम्पसमध्ये जमावावर चाकूने हल्ला केला. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. वूशी व्होकेशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड टेक्नॉलॉजी येथे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. हल्लेखोराला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोर विद्यार्थी पदवी परीक्षेत नापास झाला आहे. ज्यामुळे त्याची मानसिक अवस्था बिघडली होती. परीक्षेतील अपयश, तसेच पदवी न मिळाल्याने आणि इंटर्नशिपसाठी कमी पगार मिळाल्याने तो नाराज होता. संतप्त अवस्थेत त्याने वूशी व्होकेशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड टेक्नॉलॉजीमधील अनेकांना लक्ष्य केले. त्यांच्यावर चाकू हल्ला करून मनुष्यहानी केली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
या हल्ल्यात 17 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याची भीती देखील पोलिसांनी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी एका कार चालकाने आपले वाहन क्रीडा केंद्रात घुसवले होते. त्या हिट अँड रन प्रकरणातही 35 जणांचा मृत्यू झाला होता तर 43 जण जखमी झाले होते.