Published on
:
16 Nov 2024, 7:57 pm
Updated on
:
16 Nov 2024, 7:57 pm
मणिपूर : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार सुरू झाला असून शनिवारी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या घरावर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. बिरेन सिंह यांच्या निवासस्थानी अचानक जमाव पोहोचला आणि घरावर हल्ला चढविला.
या हिंसाचारात अनेक आमदारांची घरे, मालमत्ता जाळण्यात आल्या आहेत. मणिपूर सरकारने शनिवारी राजधानी इंफालमध्ये कर्फ्यू लागू केला आहे. जिरीबाम जिल्ह्यातील तीन लोकांच्या हत्येच्या न्यायासाठी इंफालमध्ये निदर्शने सुरू झाल्यानंतर सात जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद केली आहे. इंफालमध्ये दोन मंत्री आणि तीन आमदारांच्या घरांवर आंदोलकांनी हल्ला केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सपम रंजन यांच्या लॅम्फेल सनकीथेल येथील निवासस्थानावर आणि ग्राहक व्यवहार व सार्वजनिक वितरण मंत्री एल. सुसिंद्रो सिंग यांच्या घरावरही हल्ला केला.
इंफाल पश्चिम जिल्हा दंडाधिकारी टी.एच. किरणकुमार यांनी हिंसाचाराला प्रत्युत्तर म्हणून शनिवारी दुपारी ४.३० वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्याचा आदेश जारी केला. मणिपूरमध्ये तणाव वाढल्याने इंफालमध्ये संचारबंदी लागू केली आहे. विरोधकांनी आमदारांच्या घरांना लक्ष्य केले आहे.