Published on
:
16 Nov 2024, 5:44 pm
Updated on
:
16 Nov 2024, 5:44 pm
नागपूर : काँग्रेसने अनुसूचित जनजाती व इतर मागासवर्गीयांची सतत दिशाभूल, तसेच संविधानाचा नेहमीच अनादर केला. काँग्रेस ‘झुठ की फॅक्टरी’ असल्याचा आरोप भाजपा नेते व केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज नागपुरात केला. किरेन रिजीजू यांनी यानिमित्ताने काँग्रेसला काही प्रश्न केले.
संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४६ मध्ये मसुदा समितीत एससी एसटी आरक्षणाचा प्रस्ताव ठेवला होता. पं. नेहरूंनी पर्यायाने काँग्रेसने विरोध का केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले सर्व प्रस्ताव पं. नेहरूंनी, काँग्रेसने का नाकारले? इंदिरा गांधी यांनी १९७६ मध्ये संविधानातील प्रास्ताविकेत छेडछाड का केली? या प्रश्नांचे उत्तर द्या असे रिजिजू म्हणाले. संविधानावर काँग्रेसने वारंवार हल्ला केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा पत्र दिले. ते उघड करा असे आवाहन केले. यावेळी माजी खासदार अशोक नेते, उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, चंदन गोस्वामी, सुभाष पारधी उपस्थित होते.
संविधान सन्मान, वर्षभर कार्यक्रम
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपवण्याचे काम केले. संविधान स्वीकृतीस २६ नोव्हेंबरला ७५ वर्षे पूर्ण आहेत. यानिमित्त जुन्या संसद इमारतीत विशेष कार्यक्रम होईल. संविधान निर्मितीसंबंधी छायाचित्रांचे तसेच ‘मेकिंग ऑफ इंडिया कॉन्स्टिट्युशन’ पुस्तकाचे प्रकाशन होईल. या दिवशी देशभरात कार्यक्रम होतील. संविधान घराघरात पोहोचावे, यासाठी १ वर्ष हे अभियान चालेल, असेही सांगितले.
दरम्यान, याच महिन्यात संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वक्फ संशोधन विधेयक संमत केले जाईल. मुस्लिमांच्या सर्वार्थ कल्याणाचे हे पारदर्शी विधेयक असून त्यामुळे मुस्लिमांत समानता येईल, असे किरेन रिजिजू यांनी सांगितले.