Published on
:
16 Nov 2024, 4:07 pm
Updated on
:
16 Nov 2024, 4:07 pm
नवी दिल्ली : खोट्या बातम्यांमुळे प्रसार माध्यमांवरील विश्वासाला तडा जातो आणि लोकशाहीला धोका निर्माण होतो, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले. खोट्या बातम्यांचा सामना करणे हे डिजीटल माध्यमांसमोरचे मोठे आव्हान आहे. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी डिजिटल माध्यांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त अश्विनी वैष्णव यांनी पत्रकारांना दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना हे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी कृत्रिम बुद्धिमतेच्या (एआय) आव्हानांवर प्रकाश टाकला.
अश्विनी वैष्णव यांनी नमूद केले की, 4G आणि 5G नेटवर्कमधील गुंतवणुकीने भारताला जागतिक स्तरावर आघाडीवर नेले आहे. सर्वात कमी किमतीमध्ये डेटा प्रदान करणारा आपला देश असल्याचे त्यांनी सांगितले. अश्विनी वैष्णव म्हणाले की, डिजिटल माध्यमांची झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, त्यासमोरील आव्हाने गंभीर आहेत. त्यासाठी डिजीटल माध्यमांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
एआयप्रणालींद्वारे निर्माण झालेल्या आव्हाने सांगताना ते म्हणाले की, मूळ निर्मात्यांच्या बौद्धिक संपदा अधिकारांचे रक्षण करण्याची गरज आहे. एआय आज डेटावर आधारित सर्जनशील सामग्री तयार करू शकते. पण तो डेटा तयार करणाऱ्या मूळ निर्मात्यांच्या अधिकारांचे आणि ओळखीचे काय होते? त्यांना त्यांच्या कामाची भरपाई दिली जात आहे किंवा त्यांची पावती दिली जात आहे का? असे सवाल त्यांनी केले. हा केवळ आर्थिक मुद्दा नाही, तर तो एक नैतिक मुद्दाही आहे, असे ते म्हणाले.