Published on
:
16 Nov 2024, 3:53 pm
Updated on
:
16 Nov 2024, 3:53 pm
नागपूर : कधीकाळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या महायुती सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची २४ हजार कोटींनी फसवणूक केली आहे, असा थेट आरोप आज (दि.१६) काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार रणदीप सिंग सुरजेवाला यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केला. राज्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार येणारच असून आम्ही बोलल्याप्रमाणे सोयाबीन उत्पादकांना ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देऊ, असा दावा त्यांनी यावेळी केला.
सोयाबीनला भाव मिळत नाही. ४८९२ रुपये एमएसपी आहे पण शेतकऱ्यांना ३ हजारच मिळत आहेत. दहा क्विंटल प्रति एकर सरासरी उत्पादन असल्याने २४ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना कमी मिळत आहेत. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च ६ हजार रुपये असून त्यांच्या हातात फक्त ३ हजार पडत असल्याने त्यांचे नुकसान होत आहे.
यावर्षी ७३ लाख टन उत्पादन आहे. मात्र, सरकारने केवळ १३ लाख २३ हजार टन खरेदीचा निर्णय घेतला. याचाच अर्थ ७४ टक्के सोयाबीन सरकार खरेदी करणार नाही. खरेदी होणारच नसेल तर मग एमएसपी आपोआप संपून जाईल. १५ ऑक्टोबरपासून कालपर्यंत फक्त ४ हजार टन खरेदी झाली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दुसरीकडे सोयाबीन आयात करून, तेल महाग करून उद्योजकांना फायदा पोहोचवायचा अशा रीतीने हे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी सरकारवर केला. सोयाबीन तेल विदेशातून मागवण्यापेक्षा हे पैसे देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.