शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना शिंदे, फडणवीस, अजित पवार कारणीभूत:राज्यामध्ये महागाईने कंबरडे मोडले, सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल

2 hours ago 1
कोल्हापूर येथे महाविकास आघाडी व कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा गांधी मैदान येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेत बोलताना सतेज पाटील यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कारणीभूत असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे. सतेज पाटील सभेत बोलताना म्हणाले, राज्यामध्ये महागाईने कंबरडे मोडले आहे. कोट्यवधींचे प्रकल्प गुजरातला नेले आहेत आणि विद्यार्थ्यांची सुद्धा आंदोलने झाली आणि महायुतीच्या काळामध्ये राज्यातील इतिहासामध्ये सर्वाधिक आंदोलन झाले. तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कारणीभूत असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी लावला आहे. प्रियंका गांधी यांच्याविषयी बोलताना सतेज पाटील म्हणाले, इंदिरा गांधींची मध्यरात्री सभा ज्या ठिकाणी झाली होती, लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत केले होते आणि आजही त्याच पद्धतीने तुमचे (प्रियांका गांधी) या मैदानामध्ये उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे. 1976 मध्ये काळम्मावाडी धरणाचे लोकार्पण करण्यासाठी इंदिरा गांधी या ठिकाणी आल्या होत्या आणि आम्ही सुद्धा त्याच धरणातून कोल्हापूरसाठी पाणी देत असल्याचे सतेज पाटील म्हणाले. सतेज पाटील पुढे म्हणाले, आम्ही फुले,शाहू, आंबेडकरांचा वारसा पुढे घेऊन जात आहोत. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. राज्यात फोडाफोडीचे राजकारण होत असताना ही निष्ठावंतांची फळी आपल्या स्वागतासाठी उभी असल्याचे ते म्हणाले. महिलांचा सन्मान न करण्याची प्रवृत्ती दिसून येत आहे. यांना जागा दाखवून देण्याची वेळ आली असल्याची टीका पाटील यांनी केली. दरम्यान, प्रियंका गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी राहुल गांधी यांनी बोलावे अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व काँग्रेस पक्षाची विचारधार वेगळी आहे पण बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाला नितांत आदर आहे. तसेच काँग्रेसचा कोणताही नेता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कदापी सहन करणार नाही, असेही ठणकाऊन सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article