भारताचा कर्णधार रोहित शर्मा पर्थ कसोटीला मुकणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. File Photo
Published on
:
16 Nov 2024, 3:43 pm
Updated on
:
16 Nov 2024, 3:43 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरला पर्थच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या कसोटीपूर्वी टीम इंडियाला धक्का बसला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्याला मुकणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. तो अद्याप ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचलेला नाही. त्याला शुक्रवारी पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. त्यामुळे त्याने काही काळ कुटुंबासमवेत राहण्याचे ठरवले असल्याने तो पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही.
याबाबत सूत्राने सांगितले आहे की, रोहित पहिला सामना खेळणार नाही. त्याला बीसीसीआयनेही सुट्टी मंजूर केली आहे. अशात भारताला आता त्याच्याऐवजी यशस्वी जैस्वालसोबत दुसर्या सलामीवीराची निवड करावी लागणार आहे. याआधी भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने स्पष्ट केले होते की, जर रोहित नसेल, तर अभिमन्यू ईश्वरन आणि केएल राहुल हे सलामीसाठी पर्याय ठरू शकतात.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केलेला ईश्वरन ऑस्ट्रेलियामध्ये मात्र अद्याप फार चमक दाखवू शकलेला नाही. तो भारत अ संघाकडून चारदिवसीय दोन सामने खेळला; परंतु त्याला यात फार काही करता आले नाही. तसेच सराव सामन्यातही त्याची फारशी बरी कामगिरी झाली नसल्याचे समजत आहे.
याशिवाय केएल राहुल भारत आणि भारत अ संघांत होत असलेल्या सराव सामन्यादरम्यान मुकेश कुमारचा चेंडू उजव्या हाताच्या कोपराला लागल्याने मैदानातून रिटायर्ड हर्ट होत माघारी परतला होता. त्यामुळे आता त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे अद्याप समजलेले नाही.
पण, त्याची दुखापत फारशी गंभीर नसल्याची शक्यता आहे. तसे झाले, तर तो पर्थ कसोटी खेळू शकतो; पण जर त्याची दुखापत गंभीर असेल, तर त्याला पहिल्या कसोटीला मुकावे लागू शकते.