Published on
:
16 Nov 2024, 2:03 pm
Updated on
:
16 Nov 2024, 2:03 pm
नागपूर : विधानसभा निवडणूक प्रचार अगदी अखेरच्या टप्प्यात आलेला असताना सरकार बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या 62 जागा असलेल्या विदर्भात भाजप आणि काँग्रेसकडून टोकाचा प्रचार सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या असे दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. राजकीय दृष्ट्या या दौऱ्याला महत्त्व आले आहे.
आज रात्री नागपुरात ते महायुतीच्या विदर्भातील एकंदर विजयाची शक्यता, संभाव्य समीकरण आणि घ्यावयाची खबरदारी या दृष्टीने महत्त्वाची संघटनात्मक बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मध्यप्रदेशचे मंत्री व नागपुरात तळ ठोकून असलेले कैलास विजयवर्गीय यांच्यासह संघ परिवार,महायुतीच्या काही प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांशी चर्चा होण्याची शक्यता आहे.(Maharashtra assembly poll)
उद्या रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गडचिरोली जिल्ह्यात तसेच नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. काँग्रेस नेते माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत देखील अमित शहा यांनी या मतदारसंघात सभा घेतली होती. आज शनिवारी विदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली त्याच चिमुरला काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली. उद्या प्रियंका गांधी नागपूर आणि विदर्भात आहेत. पश्चिम नागपुरात त्यांचा रोड शो देखील होणार आहे.
या एकंदरीत पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा सोमवारी अर्थात 18 नोव्हेंबर रोजी शांत होणार आहेत. यामुळे सहाजिकच उद्याचा रविवार सुपर संडे म्हणून सर्वच राजकीय पक्षांसाठी तसेच अपक्षांसाठी देखील मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.(Maharashtra assembly poll)