नरेंद्र भोंडेकर यांना विजयी करण्याचे आवाहन डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.Pudhari Photo
Published on
:
16 Nov 2024, 2:01 pm
Updated on
:
16 Nov 2024, 2:01 pm
भंडारा : महायुतीचे सरकार देणारे आहे, घेणारे नाही. विकास आणि योजनांच्या माध्यमातून घरोघरी आज लाभार्थी तयार झाले आहेत. आम्ही जे बोलतो तेच करून दाखवतो. जातीयवाद करणाऱ्या काँग्रेसपासून सावध राहा आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्या पाठीशी खंबीर उभे रहा, असे आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले. भंडारा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ आज शिवसेना नेते, खा. श्रीकांत शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
पुन्हा संधी द्या, विकासाची गंगा प्रवाहित करू : श्रीकांत शिंदे
डॉ. श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले, या मतदारसंघात अनेक कामे झाली. ती सर्व विकासाची कामे मागील अडीच वर्षात झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार सर्वसामान्यांचा कळवळा असलेले आणि त्यांचे दु:खद जाणणारे आहे. सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री असल्याने सामान्य लोकांचा विचार करून राबविल्या जाणाऱ्या योजनांमुळे आज घराघरात लाभार्थी तयार झाले आहे. सव्वा दोन वर्षात जेवढी कामे केली. कदाचित यापूर्वीच्या सरकारने ते केली नसावीत. पुन्हा संधी द्या, विकासाची गंगा प्रवाहित करून दाखवू असेही शिंदे म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर आ. परिणय फुके, आ. कृपाल तुमाने, राष्ट्रवादीचे नेते धनंजय दलाल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुधे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल गायधने, जॅकी रावलानी, संजय कुंभलकर, महेंद्र निंबार्ते, मयूर बिसेन, सुरेश धुर्वे, अनुप ढोके यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.