Published on
:
20 Nov 2024, 2:33 pm
Updated on
:
20 Nov 2024, 2:33 pm
डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण या चारही विधानसभा मतदारसंघांत बुधवारी सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांबाहेर स्वयंस्फूर्तीने रांगा लावल्या होत्या. महिलांची रांगांमध्ये लक्षणीय हजेरी होती. मतदान केंद्र, रस्ते आणि मतदारांना चिठ्ठ्या वितरणाचे बूथ परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केल्यामुळे मतदारांना धाकदपटशा करण्याच्या प्रकारांना आळा बसला होता. काही ठिकाणी झालेल्या बाचाबाचींवर पोलिसांनी मध्यस्थी करून पडदा टाकला.
कल्याण पश्चिमेकडे असलेल्या उंबर्डे भागातील पुण्योदय पार्क परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या समर्थकांनी मतचिठ्ठी देण्यासाठी बूथ लावला होता. या परिसरात महायुतीचा वरचष्मा आहे. आपल्या भागात आघाडीच्या उमेदवाराने बूथ का लावला ? यावरून महायुतीच्या एका कार्यकर्त्याने आघाडीच्या कार्यकर्त्याला बूथ लावण्यास प्रतिबंध करत शिवीगाळ केली. यावरून घटनास्थळी दोन गटांत शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर हे प्रकरण खडकपाडा पोलिस ठाण्यात पोहोचले. या घटनेची अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आघाडीच्या उमेदवाराला तेथे बूथ लावण्यास परवानगी देण्यात आली.
डोंबिवली पश्चिमेत राजूनगर परिसरात एक माजी नगरसेवक आणि एक स्थानिक कार्यकर्त्यात शाब्दिक चकमक झडली. भाजपच्या वरिष्ठाने या प्रकरणात मध्यस्थी केल्यानंतर वादावर पडदा पडला. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील दातिवली परिसरात दोन गट आमने-सामने आल्यानंतर दोन्ही गटांत बाचाबाची झाल्याची चर्चा होती. राजकीय चढाओढीतील किरकोळ प्रकार वगळता कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण परिसरात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
वृद्धांसह ज्येष्ठांचे सकाळीच मतदान
मतदानाच्या पाच दिवसांपूर्वी भारतीय निवडणूक आयोगासह पक्षीय उमेदवारांकडून मतदारांना त्यांचा नावांच्या चिठ्ठ्या घरपोच देण्यात आल्या. तर मतदान केंद्र, भाग क्रमांक, बूथ क्रमांक आणि ठिकाण आदींची माहिती व्हॉट्स ॲपसह मतचिठ्ठ्यामधून देण्यात आली होती. त्यामुळे मतदार सकाळीच स्वयंस्फूर्तीने घरातून बाहेर पडून मतदान केंद्रांवर जात होते. सकाळी सात वाजल्यापासून वृध्द, ज्येष्ठ नागरिक, कामावर जाणारे नोकरदार मतदानासाठी रांगेत होते. मतदारांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मतदान केल्यानंतर अनेक मतदार केंद्राजवळ असलेल्या केंद्रात सेल्फी काढत होते. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास परवानगी नव्हती. तरी देखील अनेक जण मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन आले होते. मतदान केंद्रांबाहेर वृध्द, ज्येष्ठ नागरिक यांना पाणी, बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
काही मतदार तर कौतुकाने त्यांच्या लहान मुलांसह, तर काहीजण पाळीव कुत्र्यांसह मतदान केंद्र परिसरात आले होते. दुपारनंतर मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन संथगतीने चालत असल्याच्या तक्रारी मतदारांकडून वाढल्या होत्या. परिणामी मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा देखील वाढल्या होत्या. मतदान केंद्रांवर महिला, वृध्द, ज्येष्ठ आणि अपंगांना प्रथम प्राधान्याने मतदान करून दिले जात होते. कल्याण ग्रामीणमधील लोकग्रामकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका उमेदवाराचा चार आकडा लिहून प्रचार करण्यात येत होता. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून तो क्रमांक पुसून काढला.
कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढले
मतदान केंद्रात येणाऱ्या मतदाराकडील चिठ्ठीवर कोणत्याही पक्षाचे चिन्हे नाही, याची खात्री करून मगच पोलिस त्यांना मतदानासाठी केंद्रात प्रवेश देत होते. उमेदवार देखिल आपापल्या मतदारसंघांमध्ये जाऊन माहिती घेताना दिसत होते. कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीतील उमेदवार मतदान प्रक्रियेची स्वतः माहिती घेताना दिसत होते. कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढले जात आहे की नाही ? याची खात्री करून घेण्याठी आपल्या मतदारसंघात समर्थकांसह फिरत होते. मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना सकाळचा नास्ता, दुपारचे जेवण, पाणी, संध्याकाळी चहाची चोख व्यवस्था करण्यात आली होती.
सकाळी 11 च्या सुमारास कल्याण पश्चिमेत काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाडामुळे मतदान करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत्या. कल्याण पश्चिमेतील इंद्रप्रस्थ, केडीएमसी मुख्यालय, प्रफुल्ल पॅराडाईज आदी ठिकाणी तांत्रिक बिघाडाची मतदारांकडून देण्यात आली.
अमेरिकन कॉर्पोरेटचे डोंबिवलीत मतदान
नोकरीनिमित्त अमेरिकेत राहणाऱ्या कॉर्पोरेट अपूर्वा पांडे दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीत दाखल झाल्या आहेत. डोंबिवली पूर्वेतील मतदार यादीत नाव असल्याने अपूर्वा यांनी सावरकर रस्त्यावरील संगीता विद्यामंदिरात मतदान केले.
144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते 9 या पहिल्या दोन तासांत 8.27 टक्के मतदान झाले. 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत 20.29 टक्के मतदान झाले. कल्याण-डोंबिवलीतील मतदारसंघांची माहिती देण्यात आली. सकाळी 11 वाजेपर्यंत कल्याण पूर्वेतील 17.81 टक्के, कल्याण पश्चिमेत 17.00 टक्के, डोंबिवलीमध्ये 20.29 टक्के आणि कल्याण ग्रामीणमध्ये 19.82 टक्के मतदान झाले. दुपारी 1 वाजेपर्यंत कल्याण पूर्वेत 28.25 टक्के, कल्याण पश्चिमेत 31.52 टक्के, डोंबिवलीत 32.42 टक्के, कल्याण ग्रामीणमध्ये 27.58 टक्के मतदान पार पडले. कल्याण-डोंबिवलीतील मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत कल्याण पूर्वेतील 37.31 टक्के, कल्याण पश्चिमेत 36.55 टक्के, डोंबिवलीमध्ये 42.36 टक्के, तर कल्याण ग्रामीणमध्ये 40.87 टक्के मतदान झाले.