शिराळा ः येथील उपजिल्हा रुग्णालयात पुरेशा सोयी-सुविधा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रुग्णांना नाईलाजाने खासगी रुग्णालयांत उपचार घेण्याची वेळ येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
या रुग्णालयात ब्लड बँक नाही. एक्स-रे मशीन बंद आहे. तसेच औषधांची कमतरता आहे. या उपजिल्हा रुग्णालयात दररोज 150 वर रुग्ण उपचारासाठी दाखल होतात, परंतु त्यांना सर्व औषधे मिळत नाहीत, अशा तक्रारी आहेत. येथे भव्य इमारत उभी राहिली, पण डॉक्टर व कर्मचार्यांची कमतरता आहे. डॉक्टर पदांबरोबरच औषध निर्माता, नर्सिंग, शिपाई, कनिष्ठ लिपिक, वॉर्डबॉय, सफाई कामगार आदींची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांवर व्यवस्थित उपचार करता येत नाहीत. येथे ब्लड बँक नाही. त्यामुळे रक्त मिळवण्यासाठी रुग्णांची धावपळ होत असते. वरिष्ठांनी यात गांभीर्याने लक्ष घालून ब्लड बँक सुरू करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. या रुग्णालयात ऑर्थोपेडिक डॉक्टर, सर्जन, दंत सहायक नाही. त्यामुळे दात, हाडांच्या तक्रारी असणार्या रुग्णांवर उपचार करता येत नाहीत.