काँग्रेसचे बडतर्फ आमदार हिरामण खोसकर यांचा गंभीर आरोप:म्हणाले - थोरात उमेदवारी देण्यास तयार होते, पण नाना पटोलेंनी थेट निलंबित केले

1 day ago 1
विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झालेले काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केलेत. नाना पटोले यांनी मला आदिवासी आमदार असल्यामुळे खूप त्रास दिला. बाळासाहेब थोरात मला विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या बाजूने होते. पण पटोले यांनी माझ्यावर थेट निलंबनाची कारवाई केली, असे ते म्हणालेत. खोसकर यांच्या या आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. हिरामण खोसकर गुरुवारी बोलताना म्हणाले, मी आदिवासी आमदार आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माझा हेतुपुरस्सर छळ केला. मला मागील अडीच महिन्यांत वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यात आला. पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात हे मला उमेदवारी देण्यास सकारात्मक होते. त्यानुसार मी सातत्याने पटोले यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भेटीसाठी मी भंडारा येथेही गेलो. तिथे त्यांनी मला उमेदवारी देण्याचा शब्द दिला. पण नंतर थेट पक्षातूनच निलंबित केले. आमदार सुलभा खोडके यांच्यावर ज्या दिवशी कारवाई झाली. त्याच दिवशी माझ्यावरही कारवाई होण्याची शक्यता होती. पण तसे झाले नाही. त्यानंतर काही दिवसांनी माझ्यावर कारवाई झाली. कारवाई पुढे ढकलण्याचा हेतू काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. उल्लेखनीय बाब म्हणजे हिरामण खोसकर यांच्यासह 7 आमदारांवर विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप आहे. काँग्रेसने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या या आमदारांना उमेदवारी नाकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर खोसकर यांनी नुकताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्यांनी काँग्रेसच्या राज्य नेतृत्वावर आरोप करून एकप्रकारने मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे महाविकास आघाडीचे हिरामण खोसकर यांच्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघात 18 इच्छुक उमेदवार आहेत. यापैकी किती उमेदवार जिंकून येण्यास सक्षम आहेत याचा उलगडा मविआने केला नाही. पण येथून महाविकास आघाडी निर्मला गावित यांना मैदानात उतरवण्याची शक्यता असल्याचा दावा केला जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article