कांडली शिवारातून अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची सुखरुप सुटका:शेकडो मोबाईल क्रमांक तपासून काढला माग, हिंगोली पोलिसांची कौतूकास्पद कामगिरी

3 hours ago 1
आखाडा बाळापूर ते कांडली मार्गावरून अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २६ तासात शोध घेऊन छत्रपती संभाजीनगर येथून शुक्रवारी ता. ४ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुखरुप सुटका केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी शेकडो मोबाईल क्रमांक तपासून माग काढला आहे. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत आडा येथील गणपतराव शिंदे हे गुरुवारी ता. ३ रात्री साडेसात वाजता त्यांच्या दुचाकी वाहनावरून आखाडा बाळापूर येथून आडा येथे गावी जात असतांना कांडली फाट्याजवळ काळ्या रंगाच्या स्कार्पिओमधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांची दुचाकी थांबवून त्यांचे अहपरण केले. त्यांना स्कार्पिओ वाहनात टाकून अज्ञातस्थळी घेऊन गेले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी शिंदे यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मुलाशी संपर्क साधला व एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सायबरसेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांनी गुरुवारी रात्रभर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात ठाण मांडले होते. रात्रभर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. या शिवाय नांदेड, हदगाव, जिंतूर भागात असलेल्या सीसीटीव्हीची पाहणी करून शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर एका पथकाने आज पहाटे पर्यंत हजारो मोबाईल क्रमांकाची तपासणी केली. यामध्ये काही मोबाईल क्रमांक संशयीत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी मोबाईल क्रमांकाच्या आधारे माग काढून आज रात्री आठ वाजता छत्रपती संभाजीनगर गाठले. त्या ठिकाणी माहिती घेऊन पोलिसांनी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गणपतराव शिंदे यांची सुखरुप सुटका केली. यामध्ये पोलिसांनी काही संशयीतांची चौकशी सुरु केल्याचे सुत्रांनी सांगितले. पोलिसांच्या कामगिरीबद्दल आखाडा बाळापूरकरांनी पोलिस अधिक्षक कोकाटे यांच्यासह पथकाचे अभिनंदन केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article