केडगावातील कुस्तीच्या मैदानामध्ये कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विजयी:उपमहाराष्ट्र केसरी बनकरचा पराभव जिंकली चांदीची गदा, 2 लाखांचे बक्षीस‎

6 days ago 3
नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर केडगाव येथील श्री रेणुकामाता देवीच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रथम क्रमांकासाठी झालेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील या कोल्हापूरच्या मल्लाने उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर (सोलापूर) यांच्यावर गुणांनी विजय मिळवला. पृथ्वीराजला मानाची चांदीची गदा व २ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील विरुध्द उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांच्यात झालेल्या कुस्ती शेवटपर्यंत निकाली लागत नसल्याने पंचांनी कुस्ती गुणांवर घेतली. यामध्ये पृथ्वीराज पाटील याने आक्रमक खेळी करुन गुणांवर विजय मिळवला. दीड लाखाच्या बक्षिसावर शुभम शिदनाळे (पुणे) विरुध्द योगेश पवार (नगर) आणि ७५ हजार रुपयांच्या बक्षिसावर हनुमंत पुरी (पुणे) विरुध्द पै. अनिल लोणारे (पारनेर) यांच्यामध्ये झालेली कुस्ती शेवट पर्यंत रंगली होती. शेवटी गुणांवर कुस्ती घेऊन देखील तोडीसतोड भिडलेल्या मल्लांची कुस्ती बरोबरीत सुटली. एक लाखाच्या बक्षीसासाठी पै. सुबोध पाटील विरुध्द पै. तुषार डुबे (पुणे) यांची कुस्ती प्रेक्षणीय ठरली. यात सुबोध पाटील याने तुषार डुबे याला आसमान दाखवून विजय मिळवला. तर ७५ हजार रुपयाच्या पै. तुषार अरुण (नगर) विरुध्द पै. सुनिल नवले (पुणे) यांच्यात झालेल्या कुस्तीमध्ये सुनिलने आक्रमक खेळी करुन डावपेचांनी कुस्ती चितपट करुन विजय संपादन केले. केडगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने या कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या निकाली कुस्त्या रंगल्या. पहिल्या पाच क्रमांकासह एकूण ३२ कुस्त्या विविध रकमेच्या बक्षीसांवर रात्री उशीरा पार पडल्या. तब्बल ९ लाख रुपयापर्यंतचे रोख बक्षिसे मल्लांना देण्यात आले. यावेळी महादेव कोतकर, हर्षवर्धन कोतकर, संपत कोतकर, आदींसह कुस्ती क्षेत्रातील नामवंत मल्ल, वस्ताद व ग्रामस्थ उपस्थित होते. पंच म्हणून अनिल गुंजाळ, गणेश जाधव, शुभम जाधव, सोमनाथ राऊत व अजय आजबे यांनी काम पाहिले. हंगेश्‍वर धायगुडे यांनी कुस्तीचे उत्कृष्ट समालोचन केले. बोल बजरंग बली की जय! चा गजर तोडीसतोड मल्ल कुस्ती आखाड्यात भिडले होते. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह भाविकांनी कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. प्रेक्षकांनी गच्च भरलेल्या मैदानात मल्लांच्या शड्डूचा आवाज घुमला. बोल बजरंग बली की जय! चा गजर करीत कुस्तीप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात मल्लांना दाद दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article